ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी हनुमानाचा फोटो ट्विट करत मानले भारताचे आभार

भारताने ब्राझिलला लसची निर्यात सुरू केली आहे
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी हनुमानाचा फोटो ट्विट करत मानले भारताचे आभार

दिल्ली l Delhi

भारतात लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर भारत अनेक देशांना करोनावरील लसीचा पुरवठा करत आहे. ब्राझीलने देखील लसीची मागणी केली होती. त्यानुसार भारताने ब्राझिलला लसची निर्यात सुरू केली आहे.भारतातून लसीचा पुरवठा सुरू झाल्यावर ब्राझिलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचा फोटो ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत.

जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचा फोटो ट्विट करत म्हंटले आहे की, "नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जागतिक संकटावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये एक पार्टनर मिळाल्याने ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लस पाठवल्याबद्दल धन्यवाद."

बोलसोनरो यांच्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिसाद दिला आहे. “बोलसोनारोजी, कोविड महामारीविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवांवरील आपलं सहकार्य भारत बळकट करत राहिलं,” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

ब्राझिलमध्ये आतापर्यंत ८६ लाख ९९ हजार ८१४ जणांना करोनाची बाधा झाली. यापैकी २ लाख १४ हजार २२८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या बाबतीत ब्राझिल जगात दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक करोना मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. तिथे आतापर्यंत ४ लाख २० हजार ९१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे लसीकरण तातडीने सुरू करण्यात आले. चीनच्या सायनोव्हॅक कंपनीने तयार केलेल्या कोरोना व्हॅक लसद्वारे लसीकरण करण्याचा निर्णय झाला. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा करण्यात सायनोव्हॅक कंपनीचा वेग कमी पडत आहे. यामुळे वेगाने लसीकरण करणे कठीण झाले आहे. या अडचणीवर उपाय म्हणून ब्राझिलने भारतातून कोविशिल्डचे डोस मागवले आहेत. आतापर्यंत ब्राझिलमध्ये २० लाख डोस पोहोचवण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com