ISRO ची आणखी एक कौतुकास्पद कामगिरी; सिंगापूरच्या सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरिकोटा । Sriharikota
चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोने आज आणखी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. इस्रोने सकाळी साडेसहा वाजता सिंगापूरचे 7 उपग्रह प्रक्षेपित केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरिकोटा केंद्रातून PSLV-C56 चे प्रक्षेपण करण्यात आलं.
श्रीहरीकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या पहिल्या लाँच पॅडवरुन हे प्रक्षेपण पार पडलं. ही एक पूर्णपणे व्यावसायिक मोहीम आहे. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड ही या मोहिमेचे संचालन करत आहे. ही संस्था अवकाश मंत्रालयाच्या अंतर्गत येते. या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा उपग्रह हा सिंगापूरचा 'DS-SAR' हा आहे. सिंगापूर सरकारच्या डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सी आणि सिंगापूरमधील एसटी इंजिनिअरिंग यांनी संयुक्तपणे हा उपग्रह विकसित केला आहे. सिंगापूर सरकारमधील संस्थांना आणि ST इंजिनिअरिंग कंपनीला व्यावसायिक वापरासाठी हा उपग्रह फायद्याचा ठरणार आहे. (Singapore Satellites)