
नवी दिल्ली | New Delhi
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) अर्थात इस्त्रोच्या महत्वाकांक्षी अवकाश मोहिमेच्या तयारीसाठीची पहिली चाचणी आज (शनिवार) यशस्वी करण्यात आली. 'टेस्ट व्हेईकल (टीव्ही-डी१) या एकाच टप्प्यातील इंधन रॉकेटचे प्रक्षेपण आज १० वाजता करण्यात आले. श्रीहरिकोटा (Sriharikota) येथून गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले असून गगनयान ४०० किलोमीटरपर्यंत अवकाशात झेपावले आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारताने अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला आहे...
'गगनयान' या भारताच्या मानवी अवकाश मोहिमेत अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री 'टीव्ही-डी१'मधील 'क्रू मोड्यूल'द्वारे घेण्यात आली. या चाचणी उड्डाणाच्या (Test Flight) यशामुळे उर्वरित चाचण्या आणि मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या गगनयान मोहिमेसाठी या चाचण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. गगनयान मोहीम २०२५ मध्ये प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे. तसेच 'टीव्ही-डी१' मध्ये सुधारित विकास इंजिनाचा समावेश केलेला असून त्याच्या पुढील भागात 'क्रू मोड्यूल' आणि 'क्रू एस्केप सिस्टिम' ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. हे यान ३४.९ मीटर उंच आहे आणि त्याचे वजन ४४ टन आहे. यावेळी चाचणी यशस्वी होताच इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी एकमेकांचे अभिनंदन केले.
दरम्यान, इस्रोकडून या उड्डाण चाचणीला 'अबॉर्ट टेस्ट' असे नाव देण्यात आले आहे. तसेच या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेले जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल. या गगनयानचे सुरुवातीला आज सकाळी ८ वाजता प्रक्षेपण होणार होते, मात्र खराब हवामानामुळे प्रक्षेपणाची वेळ बदलून सकाळी ८.४५ करण्यात आली. मात्र त्यानंतर इंजिन योग्यरित्या प्रज्वलित झाले नाही. यानंतर इस्रोकडून तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आणि १० वाजता यशस्वी उड्डाण करण्यात आले.