
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्रायल कडून हमास वरील (Israel Hamas war)हल्ले सुरुच आहेत. इस्रायलने गाझा पट्टीमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक (Israel Airstrike In Gaza Strip) केला आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात एका रात्रीत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सोमवारी पहाटेही गाझा पट्टीवर हवाई हल्ले करून बॉम्बवर्षाव (Bomb Attack) करण्यात आला.
गाझा पट्टीच्या मध्यभागी आणि उत्तरकडे इस्रायलचे हल्ले केंद्रीत होते, असे पॅलेस्टिनी माध्यमांकडून सांगण्यात आलेय. उत्तर गाझामधील जबलिया निर्वासित छावणीतील घरांवर झालेल्या हल्ल्यात अनेक पॅलेस्टिनी ठार झाले आणि काही जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आजचा १७ वा दिवस असून इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील युद्ध अधिक चिघळताना दिसत आहे. इतर देशांकडून हा संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना इस्रायल आणि हमास मात्र, एकमेकांवर तीव्रतेने हल्ले करत आहे. इस्रायलकडून गाझामध्ये बॉम्बहल्ले आणि हवाई हल्ले सुरुच आहेत.
गाझामधील निवासी इमारतीवर इस्रायली हल्ल्यात किमान ३० पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. जबलिया निर्वासित छावणीतील अल-शुहादा भागात ही इमारत होती. या हल्ल्यामुळे इमारत जमिनदोस्त झाली, त्यामुळे आजूबाजूची घरेही उद्ध्वस्त झाली आहेत.
पॅलेस्टिनी वृत्तसंस्थेनुसार, पॅलेस्टिनी प्रदेशातील निवासी भागांना इस्रायलने लक्ष्य करून सुमारे २५ इस्रायली हवाई हल्ले केल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत इस्रायली हवाई हल्ल्यात गाझामध्ये सुमारे ४०० लोक मारले गेल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे.
दरम्यान, इस्रायलने गाझा आणि लेबनॉनच्या सीमाभागातील आपल्या नागरिकांना तेथून हलवले असून त्यांना अन्यत्र वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. किर्यात शामोना हे २० हजारांची वस्ती असलेले गाव रिकामे करण्याचा आदेश संरक्षण मंत्रालयाने दिला होता. इस्रायलने शुक्रवारी पहाटे जोरदार बॉम्बहल्ला केला होता. आपण हमासशी संबंधित १०० पेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ला केल्याचे इस्रायलच्या लष्कराने सांगितले होते.