इशरत जहाँ चकमक प्रकरण : तीन पोलीस अधिकार्‍यांची निर्दोष मुक्तता

इशरत जहाँ  चकमक  प्रकरण : तीन पोलीस अधिकार्‍यांची निर्दोष मुक्तता

अहमदाबाद -

गुजरातमध्ये 2004 मध्ये घडलेल्या इशरत जहाँ चकमक प्रकरणातील आरोपी असलेल्या तीन पोलीस अधिकार्‍यांची

अहमदाबाद येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला.

चकमक प्रकरणात कोर्टाने गुन्हे शाखेचे तीन पोलीस अधिकारी तरुण बारोट, अंजू चौधरी आणि गिरीश सिंघल यांना सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले आहे. तिन्ही अधिकार्‍यांची सुटका करताना कोर्टाने म्हटले आहे की इशरत जहां लष्कर-ए-तैयबाची दहशतवादी होती. कोर्टाने म्हटले आहे की इंटेलिजन्स रिपोर्टला नाकारता येणार नाही आणि म्हणूनच तिन्ही अधिकार्‍यांना निर्दोष सोडण्यात आले आहे.

निर्दोष सोडताना कोर्टाने सांगितले की, गुन्हे शाखेचे अधिकारी जी.एल. सिंघल, तरुण बारोट आणि अंजू चौधरी यांनी आयबीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली. या अधिकार्‍यांनी जे करायला हवे होते ते केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांच्यासह 3 आरोपी पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध खटला भरण्याची परवानगी गुजरात सरकारने नाकारली असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एका न्यायालयाला दिली होती. 2019 साली राज्य सरकारने अशाच प्रकारे परवानगी नाकारल्यामुळे विशेष सीबीआय न्यायालयाने माजी प्रभारी पोलीस अधिकारी डी.जी. वंजारा आणि एन.के. अमीन यांच्याविरुद्धची कारवाई रद्द केली होती. त्यापूर्वी 2018 साली माजी प्रभारी पोलीस महासंचालक पी.पी. पांडे यांनाही या खटल्यातून मुक्त करण्यात आले होते.

इशरत जहां प्रकरण काय आहे?

15 जून 2004 रोजी गुजरात पोलिसांनी चकमकीत चार जणांना ठार केले. यामध्ये इशरत जहां, जावेद गुलाम शेख उर्फ प्राणेश पिल्लई, अमजद अली राणा आणि झीशान जोहर यांचा समावेश आहे. ते त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी अहमदाबादेत गेले होते, असा दावा गुजरात पोलिसांनी त्यावेळी केला होता. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) ही चकमक बनावट असल्याचे सांगितलं होतं. या चकमकीचे नेतृत्व डीआयजी डी.जी. वंजारा यांनी केले. 7 सप्टेंबर, 2009 रोजी चकमकीवरून झालेल्या वादानंतर मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी एस.पी. तमंग यांना चौकशी सोपविण्यात आली. त्यांनी 243 पानांचा अहवाल न्यायालयात सादर केला. यात इशरत जहां चकमक बनावट घोषित करण्यात आली. थंड डोक्याने केलेल्या हत्येप्रकरणी पोलिसांना दोषी ठरविण्यात आले. या प्रकरणी वंजारा यांना 2007 मध्ये अटक करण्यात आली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com