‘आयर्न मॅन’ कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

‘आयर्न मॅन’ कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

पुणे -

‘आयर्न मॅन’ किताब पटकविल्याबद्दल आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनमध्ये समावेश करण्यात

आला आहे.

आयपीएस - आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरी मधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे कृष्णप्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे सचिव अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्र यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांना प्रमाणपत्र देण्यात आले.ब्रिटीश संसदचे सदस्य वीरेंद्र शर्मा, आलोक शर्मा, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे भारतातील अध्यक्ष तथा दिल्ली उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. संतोष शुक्ला आदींनी आयुक्त कृष्ण प्रकाश यांना हा बहुमान मिळाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, दहा वर्षांपूर्वी कृष्णप्रकाश हे अहमदनगरचे पोलीस अधीक्षक होते. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांची कामगिरी भूषणावह होती. बेधडक कारवाईमुळे नगर जिल्ह्यातील सगळेच राजकारणी कृष्णप्रकाश यांना वचकून राहायचे. कृष्णप्रकाश यांच्या काळात एरव्ही पोलिसांच्या बदल्यांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे डीएसपी ऑफिसकडे फिरकलेही नव्हते. इतकेच नव्हे, तर बदलीसाठी पत्र देण्याचे धाडसही जिल्ह्यातील एकाही मातब्बर नेत्याने केले नाही.

कृष्णप्रकाश यांनी दूध भेसळीत अडकलेल्या अनेक बड्या नेत्यांना तुरुंगात डांबले होते. तसेच इतर घोटाळे करणार्‍यांनाही त्यांनी सुतासारखे सरळ केले होते. साहजिकच त्यांचा धसका ग्रामीण भागातील नेत्यांनीही घेतला होता. रस्त्यावर वाहन चालकांना अडवून चिरीमिरी गोळा करणार्‍या वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांवरही त्यांनी खंडणीचे गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहिले नव्हते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com