व्याजावरील व्याज माफ

औपचारिक घोषणा बाकी
व्याजावरील व्याज माफ

नवी दिल्ली -

करोना लॉकडाऊनच्या काळात कर्जावरील हप्ते आकारण्यास स्थगिती दिल्यानंतर, या काळात थकलेल्या व्याजावर व्याज आकारण्यासाठी

बँका तगादा लावत असतानाच, हे व्याज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच केली जाणार आहे. याबाबतचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.

टाळेबंदीच्या काळातील व्याजावर आकारले जाणारे व्याज माफ करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला असला, तरी त्याची माहिती शुक्रवारी (23 ऑक्टोबर) समोर आली आहे. येत्या 2 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार असून, त्यावेळी केंद्र सरकार या संदर्भात आपली भूमिका मांडणार आहे. यापूर्वी 14 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने व्याजावरील व्याज माफ करण्याचा निर्णय शक्य तितक्या लवकर घेण्यात यावा, अशी सूचना केंद्राला केली होती.

लॉकडाऊननंतर अनलॉकचा पाचवा टप्पा जाहीर करण्यात आला असला, तरी अजूनही अनेकांच्या हातांना रोजगार मिळाला नाही. अशा सर्वांचीच आर्थिक अडचण आणि जवळच असलेला दिवाळीचा महत्त्वाचा सण लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्वांनाच मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना या अतिरिक्त व्याजापासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारला सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा भुर्दंड उचलावा लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com