कृषिक्षेत्राने सावरली अर्थव्यवस्था
देश-विदेश

कृषिक्षेत्राने सावरली अर्थव्यवस्था

निर्यात करून भारताने भागवली जगाची भूक

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

करोना संकटाचा अर्थव्यवस्थेला फटका बसला असताना, देशातील कृषिक्षेत्राने अर्थव्यवस्था सावरल्याचे स्पष्ट झाले आहे. या काळात मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनांची निर्यात करून भारताने जगाची भूक देखील भागवली. दरवर्षी विविध कृषी मालाची होणारी निर्यात यंदा मार्च ते जून 2020 या कालावधीत 23.24 टक्क्यांनी वाढून ती 25 हजार 552 कोटी रुपयांची झाली, असे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली. India’s agri export

आत्मनिर्भर भारतासाठी कृषिक्षेत्राला देखील स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे, यासाठी कृषिनिर्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असून, या माध्यमातून देशाला विदेशी चलन मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात कृषी उत्पादने विकून शेतकरी, उत्पादक आणि निर्यातदारांना उत्पन्नात वाढ करणे शक्य होणार आहे असे सरकारने स्पष्ट केले आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या निर्यातीमुळे देशातील पेरणी क्षेत्र आणि कृषी उत्पादन वाढले असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. 2017 मध्ये भारताची जागतिक कृषी व्यवसायातील आयात आणि निर्यात अनुक्रमे 2.27 आणि 1.90 टक्के वाढली आहे. करोना महामारीच्या कठीण काळात जागतिक पुरवठा साखळीत बिघाड होऊ नये, याची काळजी घेत भारताने कृषी उत्पादनांची निर्यात कायम ठेवली, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

कृषी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी एक सर्वंकष कृतियोजना कृषी मंत्रालयाने तयार केली आहे. देशातील कृषी निर्यात वाढवण्याचा आणि आयात प्रतिस्थापनेसाठी मूल्यवर्धन करणे हा उद्देश या योजनेमागे आहे. अलिकडेच झालेल्या काही मोठ्या सुधारणांचा कृषिक्षेत्र साक्षीदार आहे. या अंतर्गत शेतकर्‍यांना आपली उत्पादने स्पर्धात्मक दरांत विकण्याची संधी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने केलेल्या सुधारणा, गतिशील बदल टिकवून ठेवण्यासाठी आणि कृषिक्षेत्रात सकारात्मकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले आहे. हे नियम शेतीपूरक केल्याने सकल कृषी मूल्याची वार्षिक सरासरी वृद्धी वाढून 3 टक्क्यांवर जाईल, असेही त्यांनी सांगितले.

किमान हमी भाव हे मुख्य साधन आहे. तथापि, त्यावर दिले जाणारे प्रोत्साहन हे अतिशय महाग, अपुरे आहे. प्रभावी पुरवठा साखळी अत्यंत महत्त्वाची असते आणि आता देशांतर्गत मुक्त कृषी व्यापार सुकर करण्यासाठी या सुधारणांचा फायदा घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com