भारत-अमेरिकेत होणार दोन हजार कोटींचा संरक्षण करार?

अमेरिकचे संरक्षण मंत्री 19 मार्चला भारत दौर्‍यावर
भारत-अमेरिकेत होणार दोन हजार कोटींचा संरक्षण करार?

नवी दिल्ली -

भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन हजार कोटींचा संरक्षण करार होण्याची शक्यता आहे. या करारांतर्गत भारत अमेरिकेकडून

30 ड्रोन खरेदी करू शकतो. भारत आपल्या तीनही सैन्यदलाच्या सशक्तीकरणासाठी एमक्यू-9 रीपर ड्रोन खरेदी करण्याची शक्यता आहे. चीन आणि पाकिस्तानसोबतचा वाढता तणाव लक्षात घेता भारत आपल्या लष्कराची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेच्या बैठकीत या सशस्त्र ड्रोनच्या खरेदीवर शिक्कामोर्तब होऊ शकते. या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड अ‍ॅस्टिन या महिन्यात भारत दौर्‍यावर येणार आहेत. सॅन डिएगो येथील जनरल अ‍ॅटॉमिक्सद्वारे एमक्यू -9 ड्रोनची निर्मिती केली गेली आहे. या ड्रोनमध्ये 48 तास सतत उड्डाण करण्याची क्षमता आहे आणि सहा हजार नॉटिकल (सागरी) मैलांपर्यंत भरारी घेण्याची त्याची क्षमता आहे. संरक्षण सामग्री वाहण्याची क्षमता दोन टनपर्यंत आहे. हिंद महासागर प्रदेशात पाळत ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने असे दोन ड्रोन मागील वर्षी अमेरिकेकडून भाडेतत्त्वावर घेतले होते.

अमेरिकचे संरक्षण मंत्री 19 मार्चला भारत दौर्‍यावर

अमेरिकेचे संरक्षण मंत्री जनरल लॉयड जे. अ‍ॅस्टिन 19 ते 21 मार्च दरम्यान भारत दौर्‍यावर येणार आहेत. बायडेन सरकारचा शपथविधी झाल्यांनतर अमेरिकी मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. या दौर्‍यात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत सुरक्षा संबंधांवर विविध बैठका होणार आहे. द्विपक्षीय संबंध, प्रांतीय सुरक्षा आव्हान तसेच स्वतंत्र, मुक्त आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक प्रदेश टिकवून ठेवण्याच्या सामान्य हितसंबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com