
दिल्ली | Delhi
देशात शनिवारी आजपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा (International Flights) पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सुमारे दोन वर्षांच्या कालावधीनंतर नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली आहेत. (India Resumes Scheduled International Flights Today)
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) मार्च २०२० मध्ये करोना महामारीमुळे (COVID19) नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केली होती. पुन्हा सुरू झालेल्या प्रवासामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. यासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गाईडलाईन्स जारी केली आहेत.
काय आहेत गाईडलाईन्स?
१) आंतरराष्ट्रीय विमानातील ३ आसनं रिक्त ठेवण्यावरील निर्बंध काढण्यात आले आहेत.
२) करोना रूग्णांचा वाढता आलेख कमी झाल्यानंतर क्रू मेंबर्ससाठी पीपीई किटची लागणारी गरज संपुष्टात आणली आहेत.
३) विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात येणाऱ्या पॅट-डाऊनच्या चौकशीला सुरूवात करण्यात येणार आहे.
४) विमानतळावर आणि विमानात प्रवास करताना मास्क घालणं अनिवार्य असणार आहे.
दरम्यान नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवण्याची विमानतळ आणि विमान कंपन्यांनी पूर्ण तयारी केली आहे. भारतीय विमान कंपन्यांव्यतिरिक्त, एमिरेट्स आणि व्हर्जिन अटलांटिक सारख्या परदेशी विमान कंपन्या देखील नियमित उड्डाणे पुन्हा सुरु करण्याबद्दल खूप उत्सुक आहेत. दरम्यान, राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (IGIA) एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढतील अशी अपेक्षा आहे.