लस
लस
देश-विदेश

दिलासादायक! भारताने बनवली करोना प्रतिबंधक - कोव्हॅक्सीन लस

१२ केंद्रांमध्ये मानवी चांचण्या सुरू

Gokul Pawar

Gokul Pawar

नवी दिल्ली। New Delhi

करोना विषाणूचा कहर सुरूच असून अशातच एक चांगली बातमी येत आहे. हैदराबादच्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) या फार्मास्यूटीकल कंपनीने कोव्हॅक्सीन तयार केली आहे. भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) संयुक्तपणे ही लस लॉन्च करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान करोना प्रतिबंधक स्वदेशी लस - कोव्हॅक्सीन च्या देशात १२ केंद्रांमध्ये मानवी चांचण्या सुरू झाल्या असून पहिल्या बॅचमध्ये एकूण शंभर जणांवर त्या केल्या जात आहेत. योग्य तो प्रतिसाद मिळाला तर पुढील दोन ते तीन महिन्यात या लशीचे परिणाम समोर येतील. आगामी वर्षाच्या सुरूवातीला को-व्हॅक्सीनचे उत्पादन सुरू होऊ शकते. २०२१ च्या अखेरपर्यंत करोना प्रतिबंधक लस सर्व लोकांसाठी उपलब्ध होईल. एम्स ( अ.भा. आयुर्विज्ञान संस्था) चे संचालक डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्थेत शंभर इच्छुक व्यक्तींवर करोना प्रतिबंधक या लशीच्या चांचण्या सुरू झाल्या आहेत. चांचणीचा हा पहिला टप्पा असून , ही लस सुरक्षित आहे असे आढळले तर दुसऱ्या टप्प्यात ७५० इच्छूकांवर चांचणी केली जाईल.

या लसीच्या चांचणी पथकाचे प्रमुख डाॅ. संजय राय यांनी सांगितले की, चांचणीसाठी निवड झालेल्या शंभर निरोगी व्यक्तींपैकी पन्नास जणांना लशीचा पहिला डोस दिला जाईल. दुसऱ्या पन्नास जणांना डोस दिला जाणार नाही. डोस दिलेल्यांवर लशीचे परिणाम पाहिल्यानंतर दुसऱ्या पन्नास जणांना डोस दिला जाईल. या सर्व व्यक्ती आपापल्या घरीच राहातील. याप्रत्येकाला एक डायरी देण्यात आली आहे व या डायरीत प्रत्येकजण या लशीच्या प्रतिक्रियेत नोंद करेल. १४ दिवसांनंतर ही डायरी ते चांचणी पथक प्रमुखांना परत करतील.

करोना प्रतिबंधक लशीच्या चांचणीच्या दुसऱ्या टप्प्यात १२ ते ६५ वयोगटातील ७५० नोंदणीकृत व्यक्तींवर ही चांचणी केली जाणार आहे. को-व्हॅक्सीनच्या चांचणीसाठी दोन हजार इच्छुकांनी नोंदणी केली आहे. दिल्ली, गोवा, पाटणा, रोहतक इत्यादी १२ केंद्रांमध्ये करोना प्रतिबंधक लशीच्या चाचण्या होत आहेत. भारत बायोटेक या स्वदेशी औषध कंपनीने ही लस विकसीत केली आहे. अहमदाबाद मध्ये मेसर्स केडिया कंपनीने तयार केलेल्या करोना प्रतिबंधक लशीची १०४८ जणांवर चांचणी केली जाईल असे समजते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com