दिल्ली l Delhi

देशात करोना लसीकरणाला सुरुवात झाली असून तसेच करोनाबाधितांच्या संख्येत देखील सातत्याने घट होताना दिसत आहे.

यापार्श्वभूमीवर आता जागतीक आरोग्य संघटनेनेही (WHO) भारताचे कौतुक केले आहे. भारताने करोनावर नियंत्रण मिळवण्यात चांगली कामगिरी करुन दाखवली, असं संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेड्रॉस ए. गेबरेसस यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात बोलताना ट्रेडोस म्हणाले, भारताने करोनावर नियंत्रण मिळविण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्यास करोनाच्या विषाणूवर आपण सहज मात करु शकतो, हे आपल्याला भारताच्या कामगिरीवरुन दिसतं. या प्रयत्नांमध्ये लसही समाविष्ट झाल्याने आता अधिक चांगले परिणाम घडून येतील अशी आपण आशा करतो.

भारतात २१ दिवसांत ५० लाखांपेक्षा जास्त लसीकरण

भारतात २१ दिवसांत ५० लाखांपेक्षा जास्त लसीकरण झाले. आतापर्यंत ५२ लाख ९० हजार ४७४ नागरिकांना करोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. देशात शुक्रवार ५ फेब्रुवारी २०२१ रोजी लसीकरणाची १ लाख ४ हजार ७८१ सत्र पार पडली आणि ३ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवार ५ फेब्रुवारी २०२१ रोजी ३ लाख ३१ हजार २९ जणांना करोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. भारतामध्ये १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. करोना प्रतिबंधक लसचा पहिला डोसचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी २२ नागरिकांचा लस घेतल्यापासून काही दिवसांत वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाला. मागील २४ तासांत उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणाऱ्या एका ७७ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. लस घेतल्यानंतर सात दिवसांनी या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला मधुमेहाचा प्रचंड त्रास होता. लस घेतलेल्यांपैकी एकाही व्यक्तीच्या मृत्यूचे कारण करोना प्रतिबंधक लस नाही.

दरम्यान, भारतात मागील २४ तासांत करोनाचे ११ हजार ७१३ नवे रुग्ण आढळून आले असून ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १४ हजार ४८८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ०८ लाख १४ हजार ३०४ इतकी झाली आहे. देशात आज पर्यंत १ कोटी ५ लाख १० हजार ७९६ रुगणांनी करोनावर मात केली आहे. देशात सद्य स्थितीत १ लाख ४८ हजार ५९० सक्रिय रुग्ण आहे तर आतापर्यंत १ लाख ५४ हजार ९१८ रुगणांचा मृत्यू झाला आहे.