'सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला घरचा आहेर'

भारत आणि चीन यांच्यातील तणाव काहीसा निवळला आहे
'सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला घरचा आहेर'

दिल्ली l Delhi

भारत आणि चीन यांच्यातील तणाव काहीसा निवळला आहे. पॅंगॉंग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण भागातून भारत आणि चीन यांच्याकडून सैन्य मागे घेण्याची सुरुवात झाली आहे. पॅगॉंग सरोवराच्या भागात चीनने आक्रमण केल्यानंतर भारत आणि चीनचे सैन्य समोरा-समोर आले होते.

त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील सीमावीवाद शिगेला जाण्याची चिन्हं दिसत असतानाच दोन्ही देशांकडून सैन्य मागे घेण्यासाठी सहमती झाली आहे. मात्र सीमावीवादावरुन झालेल्या या घडामोडीनंतर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पँगाँग सरोवर परिसरातील सैन्य माघारीचा हवाला देत देप्सांग परिसरातील उभारण्यात आलेल्या चिनी छावणीबद्दल मोदी सरकारला सवाल केला आहे. 'चीन व भारताने पँगाँग सरोवर परिसरातून पूर्णपणे सैन्य मागे घेतल्याचं काही माध्यमांनी घोषित करून टाकलं आहे. म्हणजेच जूनमध्ये भारतीय लष्कराने एलएसी पार केले होते. ते ठिकाण आपण सोडले आहे. पण, देप्सांगच काय, जिथे चीनच्या लष्कराने छावण्या उभारल्या आहेत? शांतता', असा सवाल स्वामी यांनी मोदी सरकारला केला आहे.

दरम्यान, गलवान व्हॅलीत झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर चिनी लष्कराने (PLA) पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराने एकदा चीनचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, त्यानंतर भारत-चीन सीमेवर काही काळ युद्ध सदृश्य स्थिती निर्माण झाल्याचं चित्र होतं. या काळात भारत आणि चीन यांच्या लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू होती. अखेर मागील आठवड्यात चर्चेला यश आलं. दोन्ही देशांनी पँगाँग सरोवर परिसरातील लष्कर मागे घेण्यावर सहमती दर्शवली. त्यानंतर पँगाँगमधील लष्कर चीननं मागे घेतलं आहे.

तसेच, सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करून परराष्ट्र मंत्रालयाचा जुना दाखला देत म्हटले होते की चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी भारतात आलीच नाही. तर आता परत कशी जात आहे? असा सवाल त्यांनी केला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत म्हटले होते की, परराष्ट्र मंत्रालयाने आधी सांगितले की चीनच्या सेनेने घुसखोरी केलीच नाही. आता त्यांचे म्हणने असे आहे की भारताच्या राजनैतिक वाटाघाटीला यश आले आहे. चीन आता माघारी फिरला आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी बरोबर असू शकतात का असा सवालही स्वामी यांनी विचारला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com