दिल्ली । Delhi

करोनामुळे बसलेल्या आर्थिक संकटाच्या झटक्यातुन अजून लोक सावरलेले नाहीत. आता अशातच LPG गॅस सिलेंडरचे नवे दर समोर आले आहे. विना-सबसिडीच्या १४.२ किलोग्रामच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली नसून कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

१४.२ किलो सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून, १९ किलो सिलेंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. यानंतर मुंबईत १९ किलोचा सिलेंडर १७ रुपयांनी महाग झाला असून, आता एलपीजीच्या या सिलेंडरसाठी १२९७.५० रुपये मोजावे लागतील. तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. प्रत्येक राज्यातील करांनुसार, घरगुती सिलेंडरचा दर वेगवेगळा असतो. मिळालेल्या माहितीनुसार, १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी मुंबईत ६९४ रुपये, कोलकातामध्ये ७१० रुपये आणि राजधानी दिल्लीत ६९४ रुपये आकारले जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ किलोच्या व्यवसायिक स्वरुपात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडर दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत १९ किलोचा एलपीजी सिलेंडर १७ रुपयांनी महाग झाला असून, आता तो १२९७.५० रुपयांना मिळेल. यापूर्वी याचा दर १२८०.५० रुपये होता. तर कोलकाता येथे एलपीजी सिलेंडर १३८७.५० रुपयांवरून १४१० रुपये झाला आहे. कोलकातामध्ये २२ रुपयांनी सिलेंडर महागला आहे. तर राजधानी दिल्लीतही १७ रुपयांनी महागलेला १९ किलोचा एलपीजी सिलेंडर आता १३४९ रुपयांना मिळेल. याआधी दिल्लीत याचा दर १३३२ रुपये होता. बहुतांश प्रमाणात १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर वापरला जात असल्यामुळे याला सरकारकडून १२ सिलेंडरवर अनुदान दिले जाते. यापेक्षा अधिक सिलेंडर हवा असल्यास तो उपलब्ध बाजारमूल्यांनुसार ग्राहकाला खरेदी करावा लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाची किंमत आणि विनिमय दर यांनुसार देशातील सिलेंडरच्या दरात बदल केला जात असतो, असे सांगितले जाते.