दिल्ली l Delhi

पेट्रोल आणि डिजेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सामान्य नागरिक या दरवाढीने त्रस्त झाले आहेत. चहुबाजूने सरकारवर टीका होत आहे. दरम्यान पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भाष्य केलं आहे.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हंटले आहे की, 'आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. या किंमती हळूहळू कमी होईल. करोनामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला आणि निर्मितीला फटका बसला,' असं प्रधान यांनी इंधन दरवाढीचे कारण सांगताना म्हटलं आहे.

तसेच, आम्ही तेल उत्पादक देशांशी सतत संपर्कात आहोत. आम्ही त्यांना आवाहन करीत आहोत की, किमती वाढवू नये. येत्या काळात यात बदल होणार आहे. प्रधान म्हणाले, करोनामुळे सरकारचे बजेट लक्षणीय वाढले आहे. आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी सरकारने गुंतवणुकीत वाढ केली असून, याशिवाय भांडवली निधीतही ३४ टक्के वाढ केलीय. सरकारला खर्च करण्यासाठी पैशांची गरज आहे आणि म्हणूनच ते कर वसूल करतात. केंद्र आणि राज्य दोन्ही पेट्रोल डिझेलवर कर आकारतात. राज्य सरकारही यावेळी खर्च वाढवित आहे, त्यामुळे त्यालाही अधिक कराची गरज आहे. अर्थमंत्री या समस्येवर तोडगा काढतील, अशी आशा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.

दरम्यान, इंधनदरवाढीवरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. सोनिया गांधी यांनी इंधन दरवाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करतही प्रधान यांनी केलाय. “सोनियाजींना ठाऊक असेल की राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये इंधनावर सर्वाधिक कर आकारला जातो. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये केंद्र आणि राज्याची कमाई अगदी अल्प प्रमाणात झाली होती. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केलीय,” असं प्रधान यांनी सोनिया गांधीनी मोदींना पाठवलेल्या पत्रासंदर्भातील प्रश्नावर बोलताना सांगितलं.