
नवी दिल्ली -
उत्तर प्रदेशच्या उरई जिल्ह्यात दोन तरूणींनी काँग्रेस जिल्हाध्यक्षाला भररस्त्यात चपलेनं चोप दिला. आता मारहाण झालेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाने
यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मी ज्या राजकीय कटात अडकलो आहे, तो मला समजलेला नाही. दोन महिला अचानक आल्या व त्यांनी माझी कॉलर धरली. त्यांच्यासोबत चार पुरूष होते जे व्हिडिओ तयार करत होते. असं तरूणींकडून मारहाण झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा यांनी सांगितलं आहे.
तर, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
या तरूणी काँग्रेस जिल्हाध्यक्षास अक्षरश: चपलेने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, या तरूणी भररस्त्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षास चोप देत असताना, त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे .
जालौनचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा हे कधी हात जोडून तर कधी त्या तरूणींचे पाय धरून माफी मागत होते. मात्र, अतिशय संतापलेल्या या तरूणींनी त्यांना झोडपून काढले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी रेल्वेस्टेशन जवळ ही घटना घडली. या तरूणींचा आरोप होता की, हा व्यक्ती त्यांना फोन करून अश्लील भाषेत बोलत होता. एवढच नाहीतर तरूणींचा हा देखील आरोप आहे की, फोनवर जबरदस्ती अश्लील भाषेत बोलण्याशिवाय हा व्यक्ती त्यांना एकांतात भेटण्यासही वारंवार सांगत होता.
अखेर या तरूणींनी अनुज मिश्रा यांना भेटीच्या बहाण्याने रेल्वेस्टेशन परिसरात बोलावले व नंतर त्यांना बेदम झोडपले. या तरूणींनी म्हटले आहे की, जेव्हा त्यांनी अनुज मिश्रा यांना सांगितले होते की त्या त्यांची तक्रार करतील, तेव्हा माझे वरपर्यंत पोहोच असल्याचे सांगून त्याने या तरूणींना धमकावले होते.