
हैदराबाद | Hyderabad
हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला कॉल आणि मेसेज केला म्हणून एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे याच मुलीसोबत पूर्वी प्रेमसंबंध होते. त्यानंतर या मुलीचे प्रेमसंबंध आरोपीसोबत जुळले.
आपल्या प्रेयसीला तिच्या पूर्वीच्या प्रियकराने फोन केला म्हणून आरोपीने आपल्याच मित्राची हत्या केली. हत्येनंतर आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याने अत्यंत क्रूर अशा पद्धतीने आपल्या मित्राची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित नवीन आणि आरोपी हरिहरा कृष्णा दिलसुखनगरमधील एकाच महाविद्यालयात शिकले. नवीनचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोन वर्षांनी प्रेमसंबंध संपुष्टात आले. त्यानंतर हरिहरा कृष्णा त्या तरुणीच्या संपर्कात आला. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ब्रेक अप होऊनही दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही नवीन आपल्या प्रेयसीला मेसेज करत असल्यानं आरोपी हरिहरा कृष्णा संतापला.
नवीन पुन्हा एकदा तरुणीसोबत सूत जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं कृष्णाला वाटत होतं. त्यामुळे तो नवीनचा काटा काढण्याच्या तयारीत होता. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून तो कट रचत होता. १७ फेब्रुवारीला कृष्णा आणि नवीन हैदराबाद शहराच्या बाहेर असलेल्या अब्दुल्लाहपूर येथे पार्टीसाठी भेटले. दारुच्या नशेत असलेल्या दोघांचा वाद झाला.
माझ्या प्रेयसीला कॉल, मेसेज का करतोस अशी विचारणा करत कृष्णानं नवीनवर हल्ला केला. त्यानं नवीनची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर कृष्णानं नवीनचं गुप्तांग आणि हृदय कापून काढलं. त्यानं नवीनची बोटंदेखील कापली आणि त्याचे फोटो प्रेयसीला पाठवले. मात्र हरिहर कृष्णा आपल्यासोबत मजाक करत आहे, असं त्याच्या प्रेयसीला सुरुवातीला वाटलं. मात्र त्यानंतर आरोपी स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.