
दिल्ली | Delhi
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Walkar Murder Case) अजून काही धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची सविस्तर माहिती आहे. त्यात आफताबचा कबुली जबाब आहे. त्यानुसार आफताबनं श्रद्धाची हत्या केल्यानंतर तीन चार महिन्यांनी तिचा चेहरा आणि डोक्यावरचे केस ब्लो टॉर्चनं जाळण्याचा प्रयत्न केला. श्रद्धाची ओळख कधीच पटू नये यासाठी आफताबनं ब्लो टॉर्चचा वापर केला.
तर श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब पुनावाला याने तिची हाडं मिक्सरमध्ये टाकून त्याचा चुरा केला होता. यानंतर त्याने त्या राखेची विल्हेवाट लावली होती असा दिल्ली पोलिसांचा (Delhi Police Chargesheet) दावा आहे. आफताबने मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर जंगलात फेकून दिले होते. यामध्ये तिचं मुंडकं सर्वात शेवटी होतं. त्याने तब्बल तीन महिन्यांनी हे मुंडकं फेकून दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
आफताब पूनावालाबरोबर श्रद्धा वालकर लिव इन रिलेशनशीपमध्ये होती. आफताबशी नाते ठेवण्याबाबत श्रद्धाच्या कुटूंबीयांनी विरोध केला होता. मात्र श्रद्धा कुटूंबाचा विरोध झुगारून आफताबसोबत रहात होती. मुंबईनंतर आफताब आणि श्रद्धा दिल्लीत छतरपूर परिसरात एका फ्लॅटमध्ये रहात होते. येथेच आफताबने १८ मे रोजी श्रद्धाशी झालेल्या वादातून त्याची हत्या केली होती. इतकेच नाही तर त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. अनेक आठवडे तो श्रद्धाच्या शरीराचे तुकडे महरौलीच्या जंगलात जाऊन फेकत होता.
पोलिसांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे जवळपास २० तुकडे हस्तगत केले होते. डिसेंबर २०२२ मध्ये आफताबची पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट झाली होती. त्यामध्ये त्याने श्रद्धाची हत्या केल्याचे कबूल केले होते. सूत्रांनी सांगितले की, चौकशीत आफताबच्या चेहऱ्यावर श्रद्धाच्या हत्येचा जराही पश्चाताप नव्हता. श्रद्धा हत्या प्रकरणाने देशभर खळबळ माजवली होती. या प्रकरणाला लव्ह जिहादच्या अँगलनेही पाहिले जात आहे. श्रद्धाच्या वडिलांनी आफताबला फाशी देण्याची मागणी करत लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली आहे.