
दिल्ली । Delhi
नाताळाच्या सुट्या घालवण्यासाठी हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली येथे गेलेल्या मित्रांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या ठिकाणी पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराशूटचा बेल्ट निसटल्याने एका तरुणाचा खाली कोसळून मृत्यू झाला.
मृत तरुण साताऱ्यातील शिरवळचा असून सूरज शहा असं त्याचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरवळमधील सूरज शहा हा मित्रांसोबत हिमाचल प्रदेशातील कुलू मनाली इथं गेला होता. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी ते गेले होते. तेव्हा पॅराग्लायडिंग करत असताना सूरज ८०० फुटांवरून खाली पडला. सूरजला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या दुर्घटनेत पायलटसुद्धा जखमी झाला आहे.
कुलू-मनाली येथील प्रेक्षणीय स्थळांसोबत पॅराग्लायडिंग हे पर्यटकांचे खास आकर्षण असते. अनेक पर्यटक खास पॅराग्लायडिंगसाठी मनालीत दाखल होतात. साहसी प्रकार असलेल्या पॅराग्लायडिंगसाठी सुरक्षेच्यादृष्टीने काही मानकेदेखील असतात. मात्र, सूरजचा अपघाती मृत्यू सेफ्टी बेल्ट निसटल्याने झाल्याने त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.