देशभरात पाऊस
देश-विदेश

देशभरात पाऊस

बिहारमध्ये 80 लाख लोकांंना पुराचा फटका

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

मागील एक महिन्यापासून देशातील पूर्वोत्तर राज्यांना पुराचा फटका बसला असून, राजस्थानात पाऊससंबंधी दुर्घटनांत सातजणांचा मृत्यू झाला, तर बिहारमध्ये सुमारे 80 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. तसेच, या राज्यात आतापर्यंत 25 जणांना प्राण गमावावे लागले आहे. heavy rain in india

दरम्यान, महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

देशाच्या पूर्व भागातील आासाम राज्यातील धेमाजी, लखीमपूर आणि बक्सामध्ये जवळपास 12 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. येत्या दोन दिवसांत उत्तर पश्चिम आणि पश्चिमोत्तर भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

राजस्थानातील चुरू आणि नागौरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. लोकांच्या बचावासाठी तीन जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ आणि 20 जिल्ह्यांमध्ये एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिकार्‍यांना उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत. याशिवाय ओडिशाच्या काही भागात 13 ऑगस्टपासून पूरस्थिती कायम आहे. महाराष्ट्रात कृष्णा, वारणा आणि कोयना नद्यांतील पाणीपातळी वाढली आहे. मध्य प्रदेशातील पश्चिम भागात आगामी तीन ते चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशात अनेक गावे अद्यापही पुराच्या वेढ्यात असून, मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी परिस्थितीची माहिती घेतली. तसेच, पूरग्रस्त भागातील लोकांना तत्काळ प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली जावी, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिल्या. दरम्यान, उत्तर प्रदेशात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात लोकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाची एकूण 22 पथके कार्यरत आहेत. राज्यातील 15 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून, पूरग्रस्त भागात धान्य पुरवण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com