Haridwar Kumbh Mela 2021: यंदाचा कुंभमेळा ३० दिवसांचाच

जाणून घ्या काय आहे कारण
Haridwar Kumbh Mela 2021: यंदाचा कुंभमेळा ३० दिवसांचाच

हरिद्वार l Haridwar

हिंदू धर्माचे कुंभपर्व हे महत्त्वाचे पर्व आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम आहे. या वर्षी हरिद्वार येथे ११ वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या कुंभमेळाचं आयोजन १ ते ३० एप्रिल दरम्यान केले जाणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार करोनाचा हॉटस्पॉट बनण्याची भिती लक्षात घेता कालावधी फक्त ३० दिवसांचाच ठेवण्यात आल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी दिली आहे. या कुंभमेळ्याची अधिकृत माहिती मार्च महिन्याच्या शेवटी दिली जाईल असं उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नोव्हेंबर २०२०मध्ये उत्तराखंड सरकारने यंदाचा कुंभमेळा दोन महिन्यांऐवजी ४८ दिवसांचाच होईल, असं सूचित केलं होतं. यंदा कुंभमेळ्यासाठी कोणत्याही विशेष बस, ट्रेनची घोषणा केली जाणार नाही. कोणालाही बस घेऊन जायचं असेल तर त्यासाठी आधी उत्तराखंड सरकारची परवानगी अनिवार्य असेल. यंदा कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी करोना लसीचे देखील अधिकचे डोस पुरवले जाणार आहेत.

तसेच, केंद्र सरकारने हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार यामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपल्या नावाची नोंद करावी लागणार आहे. तसेच उत्तराखंड राज्य सरकारलाही केंद्र सरकारने यासंबंधी निर्देश दिले आहेत.

केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशनात असं सांगितलंय की या कुंभ मेळाव्यासाठी जे आरोग्य कर्मचारी नेमण्यात येतील त्यांनी आधीच करोनाची लस घेतलेली असावी. तसेच या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनीही कोरोनाची लस घेतलेली असावी असेही केंद्राने सांगितलंय. या कुंभ मेळाव्यात भाग घेतलेल्या प्रत्येक भाविकासाठी नाव नोंदणी बंधनकारक आहे. त्या भाविकाने आपले करोना चाचणीचे निगेटिव्ह सर्टिफिकेट सोबत बाळगणेही बंधनकारक आहे. या कुंभमेळाव्यात ६५ वर्षावरील वृद्ध, गर्भवती महिला, दहा वर्षाच्या आतील मुले आणि गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांनी भाग घेऊ नये असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आलंय.

दरवर्षी कुंभ मेळाव्यासाठी देशभरातून तसेच जगभरातून लाखो भाविक आणि पर्यटक भाग घेतात. हरिद्वार कुंभ मेळावा हा करोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येत आहे. देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असली तर खबरदारीचा उपाय म्हणून कुंभ मेळाव्याच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी होऊ नये याकडे केंद्र सरकारचा कल आहे. हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्याची तयारी जोरात सुरु आहे. शहरातील भिंतींना रंग देण्यात येत आहे. रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. साधू-संतांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तंबू तयार करण्यात येत आहेत.

कुंभमेळा १२ वर्षांनीच का भरतो ?

हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. ८३ वर्षानंतर पहिल्यांदाच कुंभमेळा १२ वर्षांऐवजी ११ वर्षांच्या अंतराने घेण्यात येणार आहे. कुंभमेळा दर १२ वर्षांनी चार पवित्र नद्यांपैकी एकाच्या काठावर साजरा केला जातो. ज्यात हरिद्वारमधील गंगा, उज्जैनमधील शिप्रा, नाशिकमधील गोदावरी आणि अलाहाबादमधील त्रिवेणी संगम या नद्यांचा समावेश आहे.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, जेव्हा बृहस्पति कुंभात प्रवेश करतो आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करतो, त्यावेळी कुंभमेळा आयोजित केला जातो. कुंभमेळ्याची पौराणिक मान्यता अमृत मंथनशी संबंधित आहे. देव आणि असुरानी समुद्रमंथनाच्या वेळी त्यातून प्रकट होणारी सर्व रत्ने आणि वस्तू वाटून घेण्याचा निणर्य केला होता. समुद्राच्या मंथनातून निघालेले सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे अमृत, ते मिळविण्यासाठी देव आणि असुर यांच्यात संघर्ष सुरु झाला. असुरांपासून अमृत वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी ते अमृताने भरलेले पात्र आपल्या गरुडाला दिले. असुरांनी अमृताने हे पात्र गरुडापासून हिसकावून घेण्याचा प्रत्यन केला, त्यावेळी या पात्रातील काही थेंब अलाहाबाद, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन येथे पडले. तेव्हापासून प्रत्येक १२ वर्षांच्या अंतराने या स्थानांवर कुंभमेळा भरवला जातो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com