Kumbh Mela 2021 : कुंभमेळ्यात अनेकांना करोनाची लागण; उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात...

'अनेक संत, भाविक पॉझिटीव्ह'
Kumbh Mela 2021 : कुंभमेळ्यात अनेकांना करोनाची लागण; उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात...
Kumbh Mela 2021 File Photo

दिल्ली | Delhi

देशात प्रचंड वेगाने होत असलेल्या करोना संक्रमणामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. करोना संकटाने देशात हाहाकार उडवलेला असताना आता आणखी एक चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. हरिद्वारमध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्यात गेल्या दोन दिवसांमध्ये जवळपास एक हजार जण करोना संक्रमित झाले आहेत.

हरिद्वार हे सध्या साधू-संत आणि भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. कुंभमेळ्याच्या गर्दीत करोना नियमांचे उल्लंघन सऱ्हासपणे होऊ लागल्याने करोना संक्रमितांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. यावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांनी, 'कुंभमेळ्याची तुलना बंदिस्त ठिकाणी पार पडलेल्या आणि परदेशी नागरिकांनी हजेरी लावलेल्या निजामुद्दीन मरकजसोबत केली जाऊ नये,' असं म्हटलं आहे.

तसेच, कुंभमेळ्याला हजेरी लावणारे भक्त बाहेरचे नसून आपले लोक आहेत असंही एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटल आहे. तसंच कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा येतो आणि हा लोकांच्या श्रद्धा आणि भावनेचा विषय असल्याचंही ते म्हणाले आहेत. लोकांचं आरोग्य प्राथमिकता आहे, पण श्रद्धेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हरिद्वार शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ८१२ इतकी झाली आहे. सोमवारी हरीद्वारमध्ये नवे ४०८ कोरोना संक्रमित आढळून आले होते. तर उत्तराखंड राज्यात २४ तासात १ हजार १९२५ नवे करोना संक्रमित आढळून आले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच भारतात गेल्या २४ तासात देशात तब्बल १ लाख ८४ हजार ३७२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ३८ लाख ७३ हजार ८२५ इतकी झाली आहे. तसेच गेल्या २४ तासात ८२ हजार ३३९ जण उपचारानंतर बरे झाले असून १०२७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी २३ लाख ३६ हजार ०३६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सक्रिय रुग्नांची संख्या १३ लाख ६५ हजार ७०४ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ७२ हजार ०८५ इतकी झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com