करोनाच्या पार्श्वभूमीवर 'हज 2021' राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांवर अवलंबून असेल

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती
करोनाच्या पार्श्वभूमीवर 'हज 2021' राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांवर अवलंबून असेल

दिल्ली | Delhi

करोनाच्या पार्श्वभूमीवर हज 2021, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांवर अवलंबून असेल असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल सांगितले. नवी दिल्लीत केंद्रिय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या अध्यक्षतेखाली हज 2021 ची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

हज 2021 जून-जुलै महिन्यात होणार आहे, परंतु कोरोना आपत्ती आणि त्यावरील परिणामांचा सखोल आढावा घेऊन आणि सौदी अरेबिया आणि भारत सरकारच्या लोकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन हज 2021 संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.करोनामुळे मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन हज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून येऊ शकतो. यामध्ये भारत आणि सौदी अरेबियामधील निवास व्यवस्था, वाहतूक, आरोग्य आणि इतर व्यवस्था समाविष्ट आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंची आरोग्य सुरक्षा सर्वात महत्वाची आहे असे नक्वी म्हणाले.

करोनामुळे 1 लाख 23 हजार लोक हज 2020 ला जाण्यास असमर्थ ठरले. भारतातील हज च्या डिजिटल प्रक्रियेमुळे या लोकांना 2100 कोटी डीबीटीमार्फत कोणत्याही कपातीशिवाय परत केले गेले आहे, असे नक्वी यांनी यावेळी सांगितले. सौदी अरेबियाच्या सरकारने 2018-19 साठी हज यात्रेकरूंच्या वाहतुकीसाठीचे सुमारे 100 कोटी रुपये परत केले आहेत. याशिवाय गेल्या तीन वर्षातील हज यात्रेकरूंच्या सुमारे 514 कोटींच्या पैशांची रक्कमही कोरोना कालावधीत परत करण्यात आल्याचेही नकवी म्हणाले. हज प्रक्रियेच्या इतिहासात प्रथमच असे करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com