
सुरत | Surat
करोनाचा विसर पडल्यानंतर सर्वकाळी सुरळीत सुरू असताना आता H3N2 या नव्या व्हायरसने डोक वर काढलं आहे. सध्या देशात H3N2 व्हायरस खूप वेगानं पसरत आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियानामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
तर आता गुजरातमध्येही H3N2 मुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील वडोदरा शहरातील एका ५८ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यामुळे त्या महिलेला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाचत उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी H3N2 विषाणूमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. राज्यात H3N2 मुळे झालेला हा पहिला मृत्यू असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात दोन दिवसांपूर्वी सुरतमध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. राज्यात H3N2 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने आता कोविड रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
या विषाणूनं त्रस्त रूग्णांमध्ये सर्दीची लक्षणं दिसून येत असली तरी हळूहळू हा विषाणू रूग्णाच्या फुप्फुसात पोहोचतो. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, 5 वर्षांखालील मुलं, गर्भवती महिला आणि वृद्धांना या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. कारण, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. अशा रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्यास त्यांचा जीवही जाऊ शकतो. जर तुम्ही डॉक्टरांशी सहमत असाल तर या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा करू नका. रुग्णाला तातडीनं रुग्णालयात घेऊन या.
ही लक्षण दिसताच सावध व्हा
- H3N2 या व्हायरसच्या संसर्गात ताप, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी, डोळ्यांत जळजळ व खोकला अशी लक्षणे दिसतात.
- ताप दोन-तीन दिवसांत बरा होतो. पण, घशाचा त्रास थोडा जास्त काळ राहू शकतो.
- एवढेच नाहीतर, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने इतरांनाही बाधा होऊ शकते.
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ICMRने H3N2 पासून सुरक्षित राहण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, लोकांना नियमित हात धुण्याचा तसेच सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तापची लक्षणे जाणवत असल्यास मास्क घालणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जावू नका. खोकताना आणि शिंकताना तोंडावर हात ठेवणे, डोळे आणि नाकाला स्पर्श न करणे असे सल्ले देण्यात आले आहेत. ताप आणि अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन औषधोचार करावा.