दिल्ली । Delhi

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊलं ठेवलं आहे. भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. आता आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेला नवीन स्ट्रेन पूर्वीच्या रूपांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. याचा अर्थ असा आहे की नवीन विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवतो. लोकांना दिली जात असलेली कोरोनाची लस नवीन स्ट्रेनविरूद्ध लढण्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि शरीरावर प्रभावी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार झाल्यामुळे ब्रिटन सरकारने नाताळच्या खरेदीसाठी तसेच सण साजरा करण्यावर निर्बंध घातले आहेत.