
दिल्ली | Delhi
एकदोन नव्हे तर चक्क ५० प्रवाशांना खालीच विसरुन विमानाने आकाशात उड्डाण केल्याचा बंगळुरु येथे घडला आहे. विमानात बसण्यासाठी आलेल्या प्रवाशांना डांबरी रस्त्यावर बसमध्येच सोडून विमान आकाशात झेपावलेच कसे? क्रू मेंबर्स, पायलट आणि व्यवस्थापन नेमके काय करत होते? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport) सोमवारी गो फर्स्टचे (Go First) विमान ५० प्रवाशांना सोडून रवाना झाले. हे सर्वच प्रवाशी बसने विमानाकडे जात होते. पण तोपर्यंत विमान हवेत झेपावले होते. ही चूक लक्षात आल्यानंतर विमान कंपनीने या प्रवाशांना ४ तास उशिराने दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवले. DGCA या प्रकरणी अहवाल मागवला आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
सोमवारी पहाटे ५.४५ च्या सुमारास ही घटना घली. तेव्हा प्रवाशी बंगळुरूहून दिल्लीच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या गो फर्स्टच्या G8 116 विमानाच्या दिशेने जात होते. प्रवाशांना टरमॅकवर उभ्या विमानापर्यंत घेऊन जाण्यासाठी एकूण ४ बस पाठवण्यात आल्या होत्या. दरम्यान, तीन बसमधील प्रवासी विमानात चढले आणि विमानाने उड्डाण भरले. दरम्यान, एक बस खालीच राहिली आणि त्या बसमधील ५० प्रवासी विमान हवेत झेपावताना केवळ पाहात राहिले.
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने बेंगळुरू विमानतळाचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, 'गोफर्स्ट फ्लाइट G8116 बेंगळुरूहून दिल्लीला ५० प्रवाशांना न घेता उड्डाण केले. या ५० प्रवाशांचे सामान फ्लाइटमध्ये होते. मात्र या प्रवाशांना न घेता विमानाने उड्डाण केले. आणखी एका सोशल मीडिया वापरकर्त्याने ट्विट केले की, 'बंगलोरहून दिल्लीला जाणाऱ्या G8116 फ्लाइटने प्रवाशांना धावपट्टीवरच सोडले.