G20 आता G21 म्हणून ओळखली जाणार?

G20 आता G21 म्हणून ओळखली जाणार?

दिल्ली | Delhi

संपुर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या जी-20 परिषदेला नवी दिल्ली येथे सुरू झाली आहे. आज (ता. 09 सप्टेंबर) सकाळी 9.30 वाजल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेसाठी उपस्थित असलेल्या देशांच्या प्रमुखांचे स्वागत केले. त्यानंतर 11 वाजता या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटनाच्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्वांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्वात प्रथम मोरोक्को येथे झालेल्या दुर्दैवी भूकंपाबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच यावेळी आफ्रिकन युनिअनला जी-20 परिषदेचे स्थायी सदस्य देण्यात आले. आफ्रिकन युनियनच्या समावेशानंतर, G20 आता G21 देखील होऊ शकते. आफ्रिकन युनियनमध्ये एकूण 55 देशांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, दक्षिण आफ्रिकेच्या समावेशामुळे, G20 हा युरोपियन युनियननंतर, आता देशांचा दुसरा सर्वात मोठा समू बनला आहे. यानंतर, कोमोरोस युनियनचे अध्यक्ष तथा आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अझाली असौमनी (Azali Assoumani) यांनी आपले स्थान स्वीकारले आणि G20 चे स्थायी सदस्य बनले.

या परिषदेतील महत्त्वाची बाब म्हणजे G20 परिषदेतही इंडिया नावाचा वापर दिसला नाही. मोदींसमोर ठेवण्यात आलेल्या देशांच्या नावाच्या पाटीवर देखील भारत असे नाव लिहिलेले होते. त्याशिवाय मोदींकडून सुद्धा देशाचा भारत असाच उल्लेख करण्यात आला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली नावाच्या संदर्भातील चर्चा ही खरी ठरत आहे. कारण आता परदेशी पाहुण्यांच्या आगमनानंतर देखील इंडिया नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याने देशाचे नाव कायमस्वरूपी ‘भारत’ असेच करण्यात येणार असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, G-20 परिषदेसाठी आलेल्या सर्व प्रमुखांचे स्वागत. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, त्या ठिकाणापासून काही अंतरावर अडीच हजार वर्षांपूर्वीचा स्तंभ आहे. या स्तंभावर ‘मानवतेचे कल्याण व सुख नेहमीच सुनिश्चित केले जायला हवे’ असे लिहिण्यात आले आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीने हा संदेश जगाला दिला होता. मानवतेचा विकास केंद्रस्थानी असावा. तसेच, येत्या काळात अविश्वासाला विश्वासात बदलायचे आहे. G-20 मुळे मानवकेंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील. भारताकडे असलेले अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित करतील, असा विश्वास देखील यावेळी पंतुप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर पंतप्रधान मोदी यांच्याकडून यावेळी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा नारा देण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com