राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी

काँग्रेस आक्रमक
राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी
राफेल

नवी दिल्ली / New Delhi - फ्रान्स (France) सरकारने भारताशी (India) झालेल्या सुमारे 59 हजार कोटी रुपयांच्या राफेल लढाऊ विमान (rafale fighter jet) खरेदी करारातील कथित भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे. यामुळे भारतातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

फ्रान्समधील राष्ट्रीय आर्थिक अभियोक्ता कार्यालयाने (पीएनएफ) दिलेल्या माहितीनुसार, भारताबरोबर झालेल्या राफेल व्यवहाराच्या गुन्हेगारी चौकशीसाठी एका न्यायाधीशाची नियुक्ती केली आहे. पीएनएफने सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी करण्यास नकार दिला होता. मात्र फ्रान्समधील शोध पत्रकारिता करणार्‍या मीडियापार्ट वेबसाईटने या करारात भारतातील अधिकार्‍यांना कोट्यवधी रुपये लाच म्हणून दिल्याचे म्हटले आहे. या करारातील घोटाळ्यासंदर्भात मीडियापार्टने वृत्त मालिका लावली होती. त्यामुळे पीएनएफला चौकशी करावी लागली आहे.

मीडियापार्टने या चौकशीवर म्हटलं, राफेल व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचं आम्ही आधीच म्हटलं होतं. दसाँ एव्हिएशनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अनिल अंबानी यांना मोठे आर्थिक सहकार्य केल्याचा दावा आम्ही रिपोर्टमध्ये केला होता.

दरम्यान, अनिल अंबानी यांच्या कंपनीला विमान निर्मितीचा अनुभव नसताना राफेल व्यवहारात भागीदार का करण्यात आलं, असा प्रश्‍न मागील अनेक दिवसांपासून उपस्थित होत आहे. सुरुवातीला या करारात दसाँची भारतीय भागीदार एचएएल कंपनी होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्रान्स दौर्‍यानंतर एचएएल ऐवजी अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपला या करारात भागीदार कऱण्यात आलं होतं. विशेष म्हणजे रिलायन्सला विमान बनविण्याचा काहीही अनुभव नाही.

काँग्रेस आक्रमक

फ्रान्स सरकारने राफेलप्रकरणी चौकशी सुरु केल्यानंतर भारतात काँग्रेसने (Congress) मोदी सरकारला घेरले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा.राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्वीटर अकाउंटवरून राहुल गांधी यांनी ‘चोर की दाढी’ एवढे तीन शब्दच ट्वीट केले आहे. याशिवाय, या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी #RafaleScam असा हॅशटॅग देखील वापरला. त्यामुळे या ट्वीटच्या माध्यमातून राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधल्याचे स्पष्ट झाले. या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. ‘फ्रान्सनेही राफेल व्यवहाराची चौकशी सुरू केलीय, आता तरी मोदी सरकार भारतात संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला परवानगी देणार का?’ असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com