माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं निधन

माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं निधन

दिल्ली | Delhi

भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि प्रख्यात न्यायाधीश सोली सोराबजी यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ९१ वर्षांचे होते.

करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोराबजी यांच्या कुटुंबिय सूत्रांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.

सोली सोरोबाजी यांचा जन्म महाराष्ट्रात १९३० मध्ये झाला. सोली सोराबजी यांनी १९५३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून वकिली क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९७१ मध्ये त्यांची सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.

१९८९-९० मध्ये ते भारताचे अ‍ॅटर्नी जनरलपदी नियुक्त झाले. यानंतर १९९८ ते २००४ दरम्यानही ते भारताचे अ‍ॅटर्नी जनरल होते. १९९७ मध्ये नायजेरियासाठी सोराबजी यांची संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.

जवळपास सात दशकं सोली सोराबजी कायदेक्षेत्रात कार्यरत राहिले. या दरम्यान त्यांनी मानवाधिकाराची अनेक प्रकरणं हाताळली आणि विजयही मिळवला. मार्च २००२ मध्ये त्यांना मानवाधिकारांचं संरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू मांडण्यासाठी 'पद्म विभूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

दरम्यान राम जेठमलानी देशाचे कायदे मंत्री असताना सोली सोरबजी अटर्नी जनरल होते. काही कायदेशीर मुद्द्यांवरून राम जेठमलानी आणि तत्कालीन सरन्यायाधीश ए.एस. आनंद यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. हे प्रकरण इतके वाढले की न्यायपालिका आणि कार्यकारिणी यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. हा संघर्ष टाळण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल जी यांनी जसवंत सिंग यांना बोलावून जेठमलानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जेठमलानी यांनीही तातडीने राजीनामा दिला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com