भारताने चीनसोबत मुकाबल्यासाठी सज्ज राहावे
देश-विदेश

भारताने चीनसोबत मुकाबल्यासाठी सज्ज राहावे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे मत

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

चीनसोबत मुकाबल्यासाठी भारताला सज्ज राहावेच लागेल, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी Foreign minister S. Jaishankar पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी हे वक्तव्य चीनसोबत होणार्‍या चर्चेच्या पाचव्या फेरीपूर्वी केले आहे.

चीन या देशासोबत समतोल राखणे सोपे नसले तरी, चीनचा विरोध करणे अत्यावश्यक असून, त्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

चीनच्या सीमेवरील कारवाया पाहता, त्याचा व्यापारावरही निश्चितपणे मोठा परिणाम होईल, असे सांगत त्यांनी चीनला कठोर संदेश दिला आहे. पूर्व लडाखमधील भारत-चीनमध्ये निर्माण झालेला तणाव आणि दोन्ही देशांचे संबंध हे दोन विषय वेगळे ठेवून विचार करणे शक्य नाही आणि हे सत्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी भारत व अमेरिकेच्या द्विपक्षीय संबंधांवरही भाष्य केले. भारताचे अमेरिकेसोबत असलेले संबंध आता बदलत आहेत. अमेरिका हा भारताचा पारंपरिक मित्र नसला तरी, आता या दोन देशांमधील संबंध बदलताना दिसत असल्याचे ते म्हणाले. चीनसोबत भारताचे संबंध द्विपक्षीय आहेत, जर अमेरिकेसोबतच्या संबंधाच्या पृष्ठभूमीवर हे पाहिले असता, हा अंदाज चुकीचा ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

भारत ठाम -

पूर्व लडाखमधील फिंगरभागासह सीमेवरील इतर ठिकाणांहून चीनने पूर्णतः माघार घ्यावी यावर भारत ठाम आहे. या आठवड्यात चीन अभ्यास गटाच्या बैठकीत पूर्व लडाखमधील स्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि सरकारच्या इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लष्करी आणि राजनयिक चर्चेदरम्यान कोणते मुद्दे उपस्थित करायचे, तसेच चीनने उपस्थित केलेल्या मुद्यांवर कोणती भूमिका घ्यायची, यावर चीन अभ्यास गटाकडून मार्गदर्शन केले जाते. या बैठकीतच भारत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा संदेश चीनला देण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com