दिल्ली l Delhi

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) आज अर्थ संकल्प लोकसभेमध्ये मांडणार आहेत. करोना संकटामुळे भारतासमोर अनेक आर्थिक आव्हाने उभी ठाकली आहेत. या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे काम अर्थसंकल्पातून करण्याचा प्रयत्न होणार आहे.

दरम्यान आज सकाळी पावणे नऊच्या सुमारस अर्थमंत्री सीतारामन अर्थ मंत्रलयामध्ये पोहचल्या तेव्हा त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे पेपरलेस असेल अशी माहिती दिली. नेहमीप्रमाणे खाता बही म्हणजेच कागदपत्रं असणारी बॅग आणण्याऐवजी यावेळी सीतारामन यांच्याकडे लॅपटॉप असल्याचं पहायला मिळालं. लाल रंगाचं कव्हर असणाऱ्या या लॅपटॉपवर राजमुद्रेचे चिन्हं होतं.

सीतारामन आणि अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे अर्थ मंत्रालयामधून संसदेत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी करोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा पेपरलेस असणार आहे अशी माहिती दिली. या अर्थसंकल्पाची डिजीटल कॉपी ऑनलाइन उपलब्ध असेल असंही सांगण्यात आलं आहे.

तसेच आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये यंदा आगामी वर्षासाठी जीडीपी ग्रोथ 11% जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थव्यवस्था V आकारात पुन्हा उसळी घेईल असा विश्वास अर्थ मंत्रालयाकडून वर्तवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये पहिल्यांदाच केंद्र सरकारला वर्ष भरात काही मिनी बजेट्स सादर करावी लागली. त्यामुळे आजचं बजेट हे त्याच बजेटला पुढे घेऊन जाणारं असेल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, तरूणवर्ग, उद्योजक, व्यापारी यांच्या आजच्या अर्थसंकल्पाकडून आशा वाढलेल्या आहेत.

सध्या नोकरवर्गातील लोकांना 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या कमाईवर 10 टक्के टॅक्स द्यावा लागतो. तर7.5 लाख ते 10 लाख रुपयांदरम्यान कमवणारे कर्मचारी 15 टक्के, 10 लाख ते 12.5 लाख रुपये असणारे 20 टक्के आणि 12.5 टक्के ते 15 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्ती 25 टक्के टॅक्स भरतात. यामध्ये आता कोणते बदल होणार का? याकडे नोकरदार वर्गाचं लक्ष लागलं आहे.