प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच सहभागी होणार महिला फायटर पायलट

यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यावर देखील करोनाचं सावट
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच सहभागी होणार महिला फायटर पायलट

दिल्ली l Delhi

यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यावरदेखील करोनाचं सावट आहे. अटारी बॉर्डर वर जॉईंट परेड रद्द झाली आहे. तसेच परदेशी पाहुण्यांशिवायच यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडणार आहे.

यावेळी मात्र एक व्यक्ती नव्यानंच सोहळ्यात आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. या व्यक्तीचं नाव आहे भावना कांत. भावना या भारतीय वायुदलाच्या फायटर पायलट दलामध्ये स्थान दिल्या गेलेल्या तिसऱ्या महिला आहेत. भावना यांना गेल्याच वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार दिला गेला. भावना भारतीय वायुसेनेनं तयार केलेल्या देखावा-संचलनाचा एक भाग असतील. या देखाव्याची थीम 'मेक इन इंडिया' अशी असणार आहे.

भावना यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''दरवर्षी मी प्रजासत्ताक दिनाची परेड टिव्हीवर पाहते. आता मी स्वतः या परेडचा एक भाग बनणार आहे. ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. दरम्यान भावना कंठ ही पहिली महिला लढाऊ पायलट्स पैकी एक आहे. अवनी चतुर्वेदी आणि मोहनासिंह यांच्यासोबत तिने 2016 साली भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ वैमानिक म्हणून प्रवेश केला होता. भावना घनश्यामपुरच्या प्रखंडच्या बाऊर या गावातील रहिवासी आहे. तिचे वडिल इंजिनीअर असून रिफायनरी टाऊनशिपमध्ये सेवा पुरवतात. भावनाने आपले संपूर्ण शिक्षण बरौनी रिफाइनरी डीएवी पब्लिक स्कूल मधून पूर्ण केले. त्यानंतर बंगलुरूच्या बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजीनियरिंगची पदवी मिळवली.

दरम्यान, भारताच्या हवाई दलात २०२० मध्ये राफेल विमानांचा समावेश झाला आहे. यानंतर पहिल्यांदाच राफेल विमान प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होत आहे. या सोहळ्यात एकलव्य आणि ब्रह्मास्त्र या दोन हवाई कसरतींसाठीच्या संरचनेसाठी राफेल विमानांची निवड झाली आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात हवाई कसरतींसाठी भारतीय हवाई दलाच्या ३८ विमानांची निवड झाली आहे. यात राफेलचा समावेश आहे. एकलव्य या हवाई कसरतीच्या संरचनेत (formation) एक राफेल विमान कमी उंचीवरुन उड्डाण करेल आणि आकाशात सरळ उभ्या रेषेत उंचच उंच जाईल. राफेल सोबत दोन जॅग्वार आणि दोन मिग २९ लढाऊ विमानं उड्डाण करणार आहेत. भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. हा ५९ हजार कोटी रुपयांचा करार आहे. हा करार २०१६मध्ये झाला. करारानुसार राफेल विमानांचा ताफा टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत आहे. पहिल्या टप्प्यात आलेली राफेल विमानं १० सप्टेंबर रोजी सर्वधर्म पूजा करुन हवाई दलात दाखल करुन घेण्यात आली.

भारत-चीन तणाव वाढला असताना पाच राफेल विमानांची पहिली तुकडी २८ जुलै रोजी भारतात पोहोचली. या विमानांना औपचारिकरित्या १० सप्टेंबर २०२० रोजी भारताच्या हवाई दलात दाखल करण्यात आले. याप्रसंगी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली, चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदुरिया उपस्थित होते. यानंतर ४ नोव्हेंबर रोजी आणखी तीन राफेल विमानांचा ताफा भारतीय हवाई दलात दाखल झाला. यामुळे भारतात दाखल झालेल्या राफेल विमानांची संख्या आठ झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com