नवी दिल्ली -

टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकार वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करणार आहे. येत्या 1 जानेवारीपासून ही योजना

बंधनकारक करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. त्या कार्यक्रमात बोलताना गडकरींना ही माहिती दिली. 1 जानेवारी 2021पासून प्रत्येक वाहनाला फास्टॅग बंधनकारक असणार आहे. फास्टॅगची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील, असे ते म्हणाले. दरम्यान, 15 डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र, फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाल्यानं केंद्र सरकारने योजना लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता. आता नव्या वर्षातच फास्टॅग योजना लागू होणार आहे.

फास्टॅगसाठी आवश्यक कागदपत्र -

वाहनाचं नोंदणीचं पत्र

वाहनाच्या मालकाचा फोटो

केवायसीसाठी आवश्यक कागदपत्र

वास्तव्याचा दाखला

काय आहे नियमावली -

फास्टॅग मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो हवा

एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येणार असून बचत खात्याला लिंक करता येईल.

डेबिट-क्रेडीट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा

टोल नाक्यावरून जाताना वाहन चालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागेल.

फास्टॅग नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांपर्यंतच काम करणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन टॅग घ्यावे लागेल व नोंदणी करावी लागणार आहे.

फास्टॅग कधीपासून?

फास्टॅग ही संकल्पना 2016 पासून सुरू करण्यात आली. चार अधिकृत बँकांनी सुमारे लाखभर वाहनधारकांना फास्टॅग वितरित केले. 2017 मध्ये हाच आकडा वाढून सात लाखांपर्यंत गेला. आणि 2018च्या अंती हा आकडा 34 लाखांवर जाऊन पोहोचला. नोव्हेंबर 2020 मध्ये रस्तेवाहतूक मंत्रालयाकडून 1 जानेवारी 2021पासून फास्टॅग बंधनकारक करण्याचे निर्देश प्रसिद्ध करण्यात आले. 1 डिसेंबर 2017 च्या आधी विक्री झालेल्या वाहनांसाठीही फास्टॅग बंधनकारक असणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, फास्टॅग अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्याबाबतचा एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत.