नवी दिल्ली -

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या 25 दिवसांपासून दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे.

आपल्या मागण्यांवर ठाम असणार्या शेतकर्यांचा सरकारविरोधातील लढा सुरुच आहे. उद्या (20 डिसेंबर) उद्या हे आंदोलक शेतकरी एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

भारतीय किसान युनियनच्या नेत्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. याचवेळी दुसरीकडे किसान भवनात शेतकर्यांचे प्रतिनिधी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्यासोबत चर्चेला बसले होते. पत्रकार परिषदेत जोपर्यंत तिन्ही कायदे मागे घेत नाहीत तोवर शेतकरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. तसेच सोमवारी 24 तास हे शेतकरी उपोषणाला बसणार आहेत. 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर हरियाणातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार असून या दिवसांत वाहनांना टोल फ्री करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

तसेच 23 डिसेंबरला शेतकरी दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी भारतीयांनी एका दिवसाचा उपवास ठेवावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी केले आहे.

मन की बात वेळी टाळ्या, थाळ्यावाजवणार

जगजीतसिंह ढल्लेवाला यांनी सर्व शेतकरी समर्थकांना 27 डिसेंबरला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मध्ये बोलतील तेव्हा टाळ्या, थाळ्या वाजविण्याचे आवाहन केले आहे. जेवढा वेळ मोदी बोलतील तेवढा वेळ थाळ्या वाजवाव्यात असे ते म्हणाले.