
कर्नाटक | Karnataka
ॲप्पल कंपनीच्या iPhone ची क्रेझ जगभरात पाहायला मिळते. आयफोनसाठी किडनी विकू पण हाच फोन घेऊ, असे गमतीत देखील काही लोक म्हणत असतात. खासकरुन तरुणांमध्ये आयफोनची बरीच क्रेझ पाहायला मिळते.
मात्र कर्नाटकात आयफोनमुळे एकाचा जीव गेला आहे. एका तरुणानं आयफोनसाठी एका डिलिव्हरी बॉयची हत्या केली. त्यासाठी त्यानं आधीच कट रचला होता. इतकंच नव्हे, तर त्याचा मृतदेह तीन दिवस घरात ठेवला. मग मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
७ फेब्रुवारी रोजी एक २०वर्षीय व्यक्ती फ्लिपकार्टच्या वतीने आयफोन डिलिव्हरी (iPhone Delivery) करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याची हत्या (Murder) करण्यात आली. २० वर्षीय फ्लिपकार्ट एजंट आयफोन डिलिव्हरी करण्यासाठी ड्युटीवर गेला होता. ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हेमंत दत्ता असे आरोपीचे नाव असून तो आरसेकेरे तालुक्यातील लक्ष्मीपुरम भागातील रहिवासी आहे.
आयफोन डिलिव्हरी करताना दोघांमध्ये पैसे देण्यावरून आणि पार्सल अनबॉक्सिंगवरून वाद झाला. रागाच्या भरात आरोपी दत्ता याने डिलिव्हरी एजंट नाईकचा भोसकून खून केला. यानंतर आरोपींनी मृतदेह एका गोणीत भरून तीन दिवसांनी अंचेकोप्लूजवळ फेकून दिला. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी डिलिव्हरी एजंटच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.
बरेच दिवस झाले तरी पीडित मुलगा घरी परतली नाही म्हणून त्याच्या भावाने पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर पोलिसांना डिलिव्हरी एजंटचा मृतदेह अर्सिकेरे तालुक्यातील अंचेकोप्लू येथे रेल्वे ट्रॅकजवळ पडलेला आढळला. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृताच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान, पोलिसांनी मृताचे फोन कॉल्स ट्रेस केले आणि आरोपींचा शोध घेण्यात यश आले. यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी व त्याच्या मित्रांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.