दिल्ली | Delhi

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने प्रतिष्ठित नारी शक्ती पुरस्कार-२०२० साठी नामांकनपत्र सादर करण्याची अंतिम

तारीख ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत वाढवली आहे. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने महिला सशक्तीकरण क्षेत्रात व्यक्ती आणि इतरांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'च्या निमित्ताने म्हणजेच ८ मार्च रोजी 'नारी शक्ती पुरस्कार' दिला जातो.

महिलांना निर्णय प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करणे, पारंपरिक आणि अपारंपरिक क्षेत्रात महिलांचा कौशल्य विकास, ग्रामीण महिलांना मूलभूत सुविधा पुरविणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती सारख्या अपारंपरिक क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन, तसेच महिलांची सुरक्षा, आरोग्य आणि निरोगीपणा, शिक्षण, जीवन कौशल्ये, सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यात केलेल्या महत्त्वाच्या कार्यासाठी व्यक्ती/गट/स्वयंसेवी संस्था/ संस्था इत्यादींना हा पुरस्कार दिला जातो. प्रशस्तीपत्र आणि 2 लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मार्गदर्शक सूचनांनुसार, किमान २५ वर्षे वयाची कोणतीही व्यक्ती आणि संबंधित क्षेत्रात कमीतकमी ५ वर्षे काम केलेल्या संस्था या पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. वय, भौगोलिक अडथळे किंवा संसाधनांची अनुपलब्धता यासारख्या अडचणींवर मात करून आपली स्वप्ने पूर्ण करणाऱ्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. त्यांचे कार्य समाजाला विशेषतः तरुणांना लैंगिक रूढी-प्रथा तोडण्यासाठी प्रेरित करते. त्यांना लैंगिक असमानता आणि भेदभावाच्या विरोधात उभे राहण्यास प्रोत्साहित करते. समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांना समान भागीदार म्हणून मान्यता देण्याचा हा पुरस्कार एक प्रयत्न आहे.