मोठी बातमी : 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार करोना लस

राज्य सरकारांना लस उत्पादक कंपन्यांकडून लस विकत घेता येणार
मोठी बातमी : 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार करोना लस

नवी दिल्ली - येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना करोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्य सरकारांना आता थेट लस उत्पादक कंपन्यांकडून लसीचे डोस विकत घेता येणार आहेत.

करोनाने देशातील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठका घेतल्या. यानंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त नागरिकांना कमीत कमी वेळेत करोनावरील लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार गेल्या वर्षाभरापासून प्रयत्न करत आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यानुसार लसी उत्पादक लसीचा 50 टक्के लसींचे डोस हे केंद्र सरकारला पुरवतील. आणि उर्वरीत 50 टक्के डोस हे राज्य सरकार किंवा खुल्या बाजारात विकण्यास स्वतंत्र असतील, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. करोनावरील लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यात लसीच्या किंमती, पुरवठा, पात्रता आणि लसीकरण प्रक्रिया अधिक लवचिक करण्यात आली आहे. लसीकरणात सहभागी असलेल्या पातळ्यांवरील भागिदारांबाबत लवचिक धोरण अवलंबण्यात आले आहे.

लस उत्पादकांना आता आपले उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवावे लागणार आहे. एवढचं नव्हे तर लसीच्या उत्पादनासाठी देश आणि विदेशातील उत्पादकांची मदतही घेता येईल. रशियाची लस स्पुटनिक-व्हीचे उत्पादनही आता भारतात होणार आहे. खासगी लस उत्पादकांनी आपल्या लसींच्या डोसेसची किंमत 1 मे पूर्वी जाहीर करून पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच खासगी हॉस्पिटल्सही बाजारातून पुरवठादारांकडून लस विकत घेऊ शकणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने लसीकरण मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचार्‍यांचे लसीकरण केले. दुसर्‍या टप्प्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले. आता तिसर्‍या टप्प्यात 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com