करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार; तुमच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे

मद्रास उच्च न्यायालयाने फटकारलं
करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार; तुमच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे

दिल्ली | Delhi

करोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. देशात करोनाची दुसरी लाट आता भयंकर होत चालली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. यामुळे देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

त्यातच महिनाभरापासून देशातील पाच राज्यात निवडणूक प्रचार जोरानं सुरु होता. यामध्ये तुंबड गर्दी पाहायला मिळाली होती. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसत नव्हते. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने आज एक अत्यंत मोठी व महत्वाची टिप्पणी करत संताप व्यक्त केला आहे.

देशात वाढत्या करोना प्रादुर्भावाची मद्रास उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन थेट निवडणूक आयोगालाच फटकारले आहे. करोनाच्या या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केला आहे.

मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी एका सुनावणीवेळी हा संताप व्यक्त केला. देशभरात करोनाची दुसरी लाट येत असताना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक रॅली काढण्यास परवानगी दिली. तुमची संस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

तसेच, 'जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे हे जरी असलं तरी जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना आपला हा अधिकार बजावता येईल. सद्य परिस्थितीत बचाव व सुरक्षा यालाच सर्वाधिक प्राधान्य पाहिजे. उर्वरीत सर्व बाबी यानंतर येतात.' याचबरोबर, '२ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहात? अशी विचारणा करत, मतमोजणीवेळी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची ब्ल्यूप्रिंट सादर करा, अन्यथा मतमोजणी रोखली जाईल, असा इशार देखील निवडणूक आयोगाला दिला आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल ३ लाख ५२ हजार ९९१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे. देशात सक्रिय रुग्नांची संख्या २८ लाख १३ हजार ६५८ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ९५ हजार १२३ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १४ कोटी १९ लाख ११ हजार २२३ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com