दिल्ली | Delhi

केंद्र सरकारने अंतर्गत विमान प्रवासासाठीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने भाड्यांवरील मर्यादा ३० टक्क्यांनी वाढविल्याने ही भाडेवाढ हाेणार आहे. याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. ही नवीन मर्यादा ३१ मार्च २०२१ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील, असे मंत्रालयाने गुरुवारी आपल्या आदेशात सांगितले.

केंद्राच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान कंपन्यांना देशांतर्गत हवाई वाहतुकीचे दर ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची आणि ८० टक्क्यांपर्यंत प्रवासी वाहतुकीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हवाई वाहतुकीच्या किमान भाड्यात १० टक्के, तर कमाल भाड्यात ३० टक्क्यांपर्यंत वाढ होणार असून, इकॉनॉमिक क्लासने प्रवास करणार्या प्रवाशांना मुंबई ते दिल्ली मार्गासाठी किमान ४००, तर कमाल ३ हजार रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होताच मे २०२० मध्ये देशांतर्गत विमान वाहतूक सुरू झाली. त्यावेळी प्रवासाला लागणार्या वेळेनुसार देशातील ७ हवाई मार्गांची विभागणी झाली होती.