पुणे -

आयुर्वेद शाखेच्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या

अधिसूचनेविरुध्द इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे 11 डिसेंबरला देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या दिवशी सर्व दवाखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. या वेळेत आय.सी.यु., अपघातग्रस्त रुग्णांसाठी असलेली अत्यावश्यक सेवा, प्रसूतीसेवा सुरु राहतील. या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या 219 शाखांमधील 45000 डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये पंजीकृत असलेले एकूण 1,10,000 डॉक्टर्स सहभागी होतील.

मेडिकल स्टुडन्टस नेटवर्क (एम.एस.एन.) या आय.एम.ए.च्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेतर्फे महाराष्ट्रातील 36 सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील 15000 वैद्यकीय विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील खाजगी आणि सरकारी महाविद्यालयात आणि अनेक नामांकित इस्पितळात पदव्युत्तर शिक्षण घेणारे 15000 ज्युनिअर डॉक्टर्स महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (मार्ड) आणि आय.एम.ए.च्या ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क (जेडीएन) तर्फे सक्रिय सहभागी होणार आहेत.

या आंदोलनाला आधुनिक वैद्यक शास्त्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या 34 संस्थांनी सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या पदव्युत्तर आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसह भारतभरातील 6 लाख आयएमए सदस्य सहभाग घेतील.

आयएमएच्या मागण्या

1. सीसीआयएमची अधिसूचना मागे घ्यावी.

2. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या 4 समित्या त्वरित रद्द केल्या पाहिजेत.

3. वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल यावर सरकारने भर द्यावा.