दिल्ली l Delhi

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेची बारावी फेरी पार पडल्यानंतरही कोंडी कायम आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेता प्रजासत्ताक दिनी दिल्ली ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

सिंधु बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी रात्री एका संशयित आरोपीला पकडले आहे. या शूटरने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला असून २६ जानेवारीला चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे सांगितले आहे. पकडण्यात आलेल्या शूटरने दिल्ली पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. २६ जानेवरी रोजी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केला आहे. या रॅलीत घुसून शेतकऱ्यांच्या नेत्यांवर गोळीबार करण्याचा कट त्याने रचला होता. ज्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळले जाईल.

शेतकऱ्यांनी त्या शूटरला माध्यमांसमोर आणले असता त्याने सांगितलं की, २६ जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या रॅलीत उधळून लावण्यासाठी चार नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल होता. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हे केलं जाणार होतं. यासाठी आमच्या टीममधील अर्धे लोक पोलिसांची वेशभूषा करून रॅलीत घुसणार होते. व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या चार नेत्यांचे फोटो आम्हाला देण्यात आले होते. ज्या व्यक्तीनं आम्हाला हे सांगितलं, तो स्वतः पोलीस आहे,” अशी खळबळजनक कबुली आरोपीनं दिली आहे. तसेच आमचे दोन गट तयार केले होते. १९ जानेवारीपासून आंदोलनस्थळी आहे. शेतकरी सोबत शस्त्र बाळगतात का यांचा शोध घेण्याचं काम दिलं होतं, असं आरोपीनं सांगितलं.

तसेच २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांना रोखण्यात येईल. त्यानंतर शेतकरी थांबले नाहीत. तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश होते. तर दुसरीकडे दहा जणांचा एक गट आहे. हा गट शेतकऱ्यांच्या रॅलीत सहभागी होऊन पाठीमागून गोळीबार करतील. जेणेकरून आंदोलक घाबरून पांगतील. त्याचबरोबर व्यासपीठावर जे चार लोक असतील, त्यांना गोळ्या घालण्याचा कट आहे. त्यांचे फोटो देण्यात आलेले आहे. ज्यानं आम्हाला हे सांगितलं, तो पोलीस आहे. त्याचं नाव प्रदीप सिंह आहे. राई ठाण्यात आहे. तो नेहमी चेहरा झाकून भेटायला यायचा, अशी माहिती आरोपीनं दिली आहे.

दरम्यान, ट्रॅक्टर परेड काढण्याबाबत शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमधील तिढा अद्याप सुटलेला नाही. शेतकऱ्यांच्या वतीनं ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात दिल्ली पोलिसांसोबत झालेल्या बैठकीबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, "पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये पोलिसांच्या वतीनं एका रोपमॅप शेतकऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. ज्यावर आम्ही विचार करुन रविवारी आमचा निर्णय कळवणार आहोत." तसेच दिल्ली पोलिसांच्या वतीनं शेतकऱ्यांना दिल्लीबाहेर ट्रॅक्टर परेड काढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परंतु, शेतकरी संघटनांद्वारे हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, हा ट्रॅक्टर मार्च दिल्लीच्या आउटर रिंग रोडवर असणार आहे. ट्रॅक्टर परेडसाठी देशभरातून लाखो शेतकऱ्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.