दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रोज रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे.

गाडीमध्ये तुम्ही जरी एकट्याने प्रवास करत असाल तरी देखील मास्क वापरणे अनिवार्य असेल. यासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे.

गाडीमधून एकट्याने प्रवास करणाऱ्यानाही दिल्ली सरकारने मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. दिल्ली सरकारच्या मास्क सक्तीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावलं. करोनाचा प्रसार रोखण्यात मास्क हे सुरक्षा कवचासारखं आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीव वाचले आहेत, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

खासगी वाहनातून एकट्याने प्रवास करणाऱ्यानाही दिल्ली सरकारने मास्क वापरणं सक्तीचे केलं आहे. मास्क नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश दिल्ली सरकारने काढलेले असून, याविरोधात चार याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या होत्या. या याचिकांवर न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिककर्त्यांची कानउघाडणी केली.

वैज्ञानिक, संशोधक, आंतरराष्ट्रीय संस्था आणि सरकारकडून करोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. लसीकरण सुरु झाले असले तरी संकट टळलेले नाही. त्यामुळे मास्क वापरणं गरजेचं असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाबाबत सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं असून काही युजर्स उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर टीका करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत करोना संक्रमणाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. मंगळवारी दिल्लीत एकूण ५१०० करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. हा गेल्या सहा महिन्यांतील सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळेच दिल्लीत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्ली सरकारकडून ३० एप्रिलपर्यंत रात्री १०.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत 'नाईट कर्फ्यू' लागू करण्यात आला आहे. तसंच करोना लसीकरण मोहीम २४ तास सुरू राहील, अशी घोषणा करण्यात आली आहे.