केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'सेंट्रेल व्हिस्टा' प्रकल्पाला स्थगिती नाही!

दिल्ली उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्याला १ लाखांचा दंड
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'सेंट्रेल व्हिस्टा' प्रकल्पाला स्थगिती नाही!

दिल्ली | Delhi

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'सेंट्रल व्हिस्टा' प्रकल्पाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. करोनाची दुसरी लाट आलेली असताना सुरु असलेलं सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं सर्व प्रकारचं बांधकाम रोखण्याचे आदेश दिले जावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असून याचिकाकर्त्यांना १ लाखांचा दंडही ठोठावला आहे. ही जनहित याचिका नसून प्रवृत्त होऊन करण्यात आलेली याचिका असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्प स्थगित करण्याची मागणी फेटाळली होती.

याचिकाकर्त्याची याचिका फेटाळून लावताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम सुरुच ठेवण्याबबत निर्देश न्यायालयाने दिले. या वेळी न्यायालयाने म्हटले की, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या निर्मितीसीठी काम करत असलेले मजूर हे प्रकल्पाच्या ठिकाणीच राहात आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम थांबविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच, डीडीएमए च्या १९ एप्रिलच्या आदेशातही अशा प्रकारचा कोणताच उल्लेखही आढळत नाही. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाकडून आगोदरच परवानगी मिळाली असल्याचेही न्यायालयाने या वेळी निदर्शनास आणून दिले.

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल याचिकेत म्हटले होते की, देशात करोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. अशा काळात सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी काम करणाऱ्या मजूरांना करोना व्हायरस संसर्गाचा मोठा धोका आहे. त्यामुळे मजुरांची सुरक्षितता पाहता सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम काही काळ स्थगित करण्याचे आदेश द्यावे.

काय आहे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प?

ल्युटेन्स दिल्ली परिसरामध्ये असलेल्या सेंट्रल व्हिस्टा भागात हा पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये संसदेची नवी इमारत, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींचं निवासस्थान, मध्यवर्ती सचिवालय आणि इतर अनेक सरकारी इमारतींचं बांधकाम या भागात केलं जात आहे. नवी इमारत त्रिकोणी आकाराची असणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजेच २०२२ पर्यंत याचं बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित आहे. टाटा प्रोजेक्टस लि.कडून बांधल्या जाणाऱ्या या इमारतीसाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इमारतीच्या बांधकामाला उशिरा सुरुवात झाली असली तरी, बांधकाम वेळेवर पूर्ण होईल अशी माहिती कंपनीने दिली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com