देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' आरोपानंतर हसीना पारकर पुन्हा चर्चेत, जाणून घ्या तिच्याविषयी

देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' आरोपानंतर हसीना पारकर पुन्हा चर्चेत, जाणून घ्या तिच्याविषयी

मुंबई | Mumbai

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. सरदार शहाबअली खान हे १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप होती आणि ती कायम केली. याच्याकडे मुंबई महापालिका आणि बीएसीची रेकी केली आणि टायगर मेमनच्या घरी तो होता. त्याने बॅाम्ब बनवत होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

तसेच सलीम पटेल हे दुसरे कॅरेक्टर आहे. आरआर पाटील बरोबर ज्या माणसाचा फोटो होता तो हा. हा हसिना पारकरचा ड्राईव्हर होता. दाऊद भारतातून गेल्यावर सर्व संपत्ती सलीम पटेलच्या नावे पावर ॲाफ अटर्नी होत होती. कुर्ल्यात ३ एकर जागा ज्याला गोवावाला कंपाऊड म्हणतात. जी एलबीएस रोडवर आहे. या जमिनीची रजिस्ट्री सॅालिटेअर नावाच्या कंपनीला विकली, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. यावरून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची (Daud Ibrahim) सख्खी बहीण तिच्या एरियातली ‘आपा’ हसीना पारकर पुन्हा चर्चेत आली आहे. जाणून घेऊयात तिच्या विषयी...

हसीना पारकरच नाव (Hasina Parkar) २१ एप्रिल २००७ ला पहिल्यांदा पोलीस रजिस्टरला नोंद झालं. १९५६ ला जन्मलेली हसीना दाऊदपेक्षा लहान. १२ भावंडांमध्ये सातवी. दाऊदचा भाऊ शब्बीर इब्राहिम कासकर बरोबर स्मग्लिंगसाठी ‘डी- कंपनी’ सुरू केली. यात त्याच्या चार बहिणी होत्या. सईदा, फरजाना, मुमताज आणि हसीना; पण अंडरवर्ल्डमध्ये कोणतीच बहीण नव्हती. शेवटी हसीना पारकर यात उतरलीच. याचं कारण होतं तिच्या पतीची हत्या.

ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर दाऊद देशाबाहेर पळाला तेव्हा मुंबईत बांधकाम व्यवसाय जोर धरत होता. बड्या बिल्डर्सकडचा बेफाम पैसा 'प्रोटेक्शन मनी'च्या नावाखाली गँगस्टर्सकडे जात होता. या बिल्डर्सना इतर टोळ्यांपासून संरक्षण देता देता अनेक गुंड स्वत:च बिल्डर्स झाले. झोपड्या आणि चाळींचा पुनर्विकास करण्यावर या नवख्या बिल्डर्सनी लक्ष केंद्रीत केले. अशा बिल्डर्सना झोपडीधारकांची आणि चाळकर्‍यांची संमती मिळवून देण्यात हसीनाचा हातखंडा होता. पुढे या बिल्डर्समधले तंटे सोडवण्याचे कामही दाऊदच्या हवाल्याने ती करू लागली.

१९९१ साली अरूण गवळी टोळीने हसीनाचा नवरा इस्माईल पारकर याची हत्या केली. या घटनेनंतर काळया धंद्याची सगळीच सुत्रं हसीनाने आपल्या हाती घेतली. यानंतरच खर्‍या अर्थाने तिचा गुन्हेगारी विश्वात सक्रिय सहभाग वाढला. दाऊदच्या नावे हिंदी सिनेमाचे परदेशातल्या विशेषत: रशिया आणि आखातातल्या प्रदर्शनाचे हक्क विकत घेण्याचेही काम ती करत असे. भारतातून मध्य-पूर्व आशियात हवालाच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करणे हा सुद्धा तिच्या अनेक व्यवसायांपैकी एक व्यवसाय होता. ईस्माईलचा बदला घेतल्यानंतर हसीना नवीन नागपाड्याच्या गार्डन हॉल अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. तिथूनच तिचं अंडरवर्ल्ड हसीना चालवणार होती.

तिथंच तिनं अड्डा जमवून क्राईम सिंडीकेट सुरू केलं. दाऊद भारत सोडून गेल्यानंतर त्याच्या बेनामी संपत्तीवर हसीना नजर ठेवायची. दाऊदचे दुबईतून कोट्यवधी रुपये हसीनाला यायचे; पण हसीनानं अंडरवर्ल्डमध्ये पकड मजबूत करायला सुरुवात केली होती. मुंबईतली मोठी बांधकामं तिच्या परवानगीशिवाय सुरूच व्हायची नाहीत. दाऊदला भीती होती की, मुंबई त्याच्या हातून निसटून हसीनाच्या हाती तर जाणार नाही ना?

२००६ मुंबईत झोपडपट्टी पुनवर्सनची कामं सुरू होती. तेव्हा हसीनानं बिल्डर कृष्ण मिलन शुक्ला आणि प्रॉपर्टी ब्रोकर चंद्रेश शाहसोबत वडाळ्याच्या झोपडपट्टीच्या पुनवर्सनाची योजना आखली. या कामासाठी एक कोटी रुपयांची गरज होती. तिघांनी अजून एक प्रॉपर्टी ब्रोकर विनोद अल्वानीला पैशांची व्यवस्था करायला सांगितलं. डेव्हलपर जयेश शहाच्या मदतीनं त्यानं एक कोटी रुपये जमवले; पण तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. जयेश शहानं पैशांची मागणी केली तेव्हा विनोदनं एक कोटीतले फक्त ७० लाख रुपये परत केले. प्रोटेक्शन मनीचं नाव सांगत हसीनानं वरचे ३० लाख परतवायला नकार दिला. जयेशनं पोलिसांची धाव घेतली; परंतु पोलिसांनी एफआयआर करायलाही नकार दिला.

पुढं त्यानं क्राईम ब्रँच गाठली. एफआयआर लिहून घेण्यासाठी पोलीस १० लाख रुपये मागत असल्याची त्यानं तक्रार केली. तेव्हा पहिल्यांदा २१ एप्रिल २००७ ला हसीना विरुद्ध एफआयआर झाली. हसीनानं प्रचंड पैसा कमावला होता. २०१४ ला ती पाच हजार कोटींची मालक असल्याचं बोललं गेलं. ६ जुलै २०१४ ला हार्ट अटॅकमध्ये तिचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com