
दिल्ली | Delhi
मोस्ट वाँटेड दाऊदची (Dawood Ibrahim) बहीण हसीना पारकर हीचा मुलगा आणि दाऊदचा भाचा अलीशाह पारकर हा NIA च्या ताब्यात आहे. त्याच्या चौकशीनंतर दाऊदबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
६७ वर्षीय दाऊदने दुसरा विवाह केला आहे. मात्र त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही. तसेच त्याने घरचा पत्ताही बदलला आहे, आता तो कराची येथील संरक्षण विभागाच्या क्षेत्रात वास्तव्य करत आहे. तेथील अब्दुला गाझी बाबा दर्गाजवळ त्याचे नवीन घर आहे, अशी माहिती अलिशाहने NIA ला दिली आहे.
दाऊद इब्राहिमची ही दुसरी पत्नी पाकिस्तानातीलच पठाण कुटुंबातील आहे. एनआयएच्या सूत्रांनुसार, दाऊद इब्राहिम हेच सांगत होता की त्याने पहिली पत्नी महजबीन हिला घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले आहे, परंतु अलीशाच्या म्हणण्यानुसार तसे अजिबात नाही.
दाऊद (Dawood Ibrahim) आणि त्याची पत्नी महजबी यांची मुलगी माहरुखचं लग्न पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद (Javed Miandad) यांचा मुलगा जुनैदबरोबर झाला आहे. काही वर्षांपूर्वी हे लग्न पाकिस्तानमध्ये पार पडलं होतं. तर रिसेप्शन दुबईमध्ये झालं होतं.
दाऊद सध्या कोणाच्याही थेट संपर्कात नसला तरी आपली गँग चालवण्यासाठी त्यानं स्वतंत्र नेटवर्क उभारले आहे. त्यातून त्याच्या कंपनीतील लोकांना त्याचा मेसेज बरोबर पोहोचवला जातो, अशी माहिती छोटा शकीलचा मेव्हणा आरिफ अबुबकर शेख उर्फ आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर शेख यांच्या चौकशीतून उघड झाली आहे.
दाऊद इब्राहिम भारतामधील मोस्ट वॉण्टेड आरोपींपैकी एक आहे. सन १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमधील तो प्रमुख आरोपी असून या बॉम्बफोटांनंतर तो पाकिस्तानमध्ये पळून गेला. मात्र पाकिस्तानने कायमच दाऊद पाकिस्तानात राहत नाही असा दावा केला आहे. असं असलं तरी दाऊदच्या पाकिस्तानमधील वास्तव्याबद्दलचे अनेक पुरावे मागील तीन दशकांमध्ये समोर आले आहेत.
दरम्यान, तपास यंत्रणेने अनेक ठिकाणांवर छापेमारी केली होती. तर दाऊदशी संबंधित दहशतवाद्यांच्या नेटवर्कमधील शेकडो जणांना अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणेकडून यासंदर्भात कोर्टात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते.