
मुंबई | Mumbai
करोनाशी लढा देणाऱ्या भारतावर आता अस्मानी संकट उभे ठाकले आहे. ६५ किमीपेक्षा अधिक वेगाने तौक्ते वादळ केरळच्या किनारपट्टीकडे निघाले आहे. याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा जाणवणार आहे.
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रात 'तौक्ते' नावाचं चक्रीवादळ घोंघावत आहे. लक्षद्वीप आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या (Arabian sea) परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र अनेकांना प्रश्न पडले असतील. या वादळाचे नामकरण कोण करत असेल. ‘तौक्ते’ चक्रीवाळाचं नामकरण म्यानमारने केले आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका सरड्याचे नाव आहे.
जगभरातील समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या देशांचा समूह, तेथे निर्माण झालेल्या वादळांना नावं देत असतात. या नावांची यादी जिनेव्हाला जागतिक हवामान खात्याच्या कार्यालयाला पाठवली जातात. तेथूनच वादळाला नावं ठेवली जातात. चक्रीवादळाला नाव देण्याची सुरूवात अमेरिकेने १९५३ साली पहिल्यांदा केली. १९७८ पर्यंत चक्रीवादळास फक्त स्त्रीलिंगी नाव देण्यात येत होते. मात्र महिला संघटनांनी यावर आक्षेप घेतला. चक्रीवादळ हा शब्द पु्ल्लिंगी असताना, फक्त स्त्रीलिंगी नाव कशासाठी असा आक्षेप घेतल्यानंतर, १९७८ पासून पुल्लिंगी नावही दिले जाऊ लागले.
चक्रीवादळांचे (cyclone)नामकरण करण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्याचाही एक इतिहास आहे. पूर्वी सर्वच वादळांना एकसारखीच नावे देण्यात येत असत. पण, त्यामुळे कोणत्या वादळामुळे कोणते नुकसान झाले, त्याचे काय परिणाम झाले, वादळाचे नेमके स्वरूप कसे होते, याची नोंद ठेवणे अधिकाधिक क्लिष्ट होत गेले. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्स इकोनॉमिक अॅण्ड सोशल कमिशन फॉर एशिया अॅण्ड पॅसिफिक (इससीएपी) यांनी साल २००० पासून आशियातल्या वादळांना नावे द्यायला सुरुवात केली. नागरिकांना हवामानाचा अंदाज आणि इशारा समजावा तसेच हवामान खाते आणि सामान्य नागरिकांमध्ये सोप्या पद्धतीने संवाद व्हावा, यासाठी वादळांना नाव द्यायची पद्धत सुरु झाली.
भारतीय उपखंडात २००० पासून चक्रीवादळांना नावं देण्यास सुरूवात झाली. यात भारत तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, मालदीव, श्रीलंका, ओमान, आणि थायलँडचा देखील समावेश आहे. यात सदस्य देशांनी प्रत्येकी ८ नावं सुचवली आहेत. ही एकूण ६४ नावांची यादी आहे. ही यादी जागतिक हवामान खात्याला सोपवण्यात आली. या यादीतूनच भारतीय उपखंडातील वादळांना नावं निवडली जातात. वादळ निर्माण झाल्यानंतर, या यादीतील क्रमांकाप्रमाणे ही नावं निवडली जातात.
तौक्ते (cyclone tauktae)नाव हे म्यानमारने दिले आहे. तौक्तेचा अर्थ गीको ''Gecko" असा होता. गीको हा बर्मीस येथे आढळणारा सरडा आहे. या सरड्याच्या नावावरून वादळाला नाव देण्यात आले आहे. तसेच यंदा येणाऱ्या वादळाची नावे बुरेवी (मालदीव), तौक्ते(म्यानमार), यास (ओमान) आणि गुलाब (पाकिस्तान) अशी असणार होती. यापूर्वी भारतात निसर्ग, अम्फान, क्यार, महा, बुलबुल, वायू, फनी ही चक्रीवादळे आली होती. यापूर्वी 2018 ला 'गाजा' नावाच्या वादळाने तामिळनाडूमध्ये प्रचंड नुकसान केले होते. भारतीय हवामान खात्याने यापूर्वी अर्णव, निसर्ग, आग, अझर, प्रभंजन तेज, गती व लुलू दी नावे सुजवली आहे.