पुणे | Pune

भारतात सध्या करोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. एकीकडे करोना रूग्णांची संख्या वाढत असताना सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी एक गोड बातमी दिली आहे.

देशात सध्या करोनाच्या दोन लस उपलब्ध आहेत. यामध्ये कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींचा समावेश आहे. आता यात आणखी एका लशीची भर पडणार आहे. भारतात या तिसऱ्या करोना लशीच ट्रायल सुरू झालं आहे आणि काही महिन्यांतच ही लसही सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमार्फत कोविशिल्ड लशीनंतर आता कोवोवॅक्स लस मिळणार आहे. अदार पूनावाला यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या लसीची ट्रायल भारतात सुरू झाली असून सप्टेंबरपर्यंत ही लस भारतात येईल, असा दावाही पुनावाला यांनी केला आहे. नवे स्ट्रेन हे भारतात लसी आल्यानंतर आढळू लागले होते. मात्र कोव्होवॅक्स ही लस आफ्रिकन आणि ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनवरही ८९ टक्के प्रभावी असल्याचं अदर पुनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमेरिकी कंपनी नोव्हावॅक्ससोबत भागीदारीने सीरम कोव्होवॅक्स लसीची भारतात निर्मिती करणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत करोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असणारी लस भारतात आलेली नव्हती.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. ही कंपंनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेका यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेली कोझिशिल्डची पहिली लस भारत आणि इतर अनेक देशांना पुरवठा करीत आहे.

लसींचा तुटवडा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. भारतातील लसीकरण मोहीम अगदी योग्य प्रकारे सुरू असताना कंपनी आपल्या दुसर्या लसीच्या प्रकल्पाकडे वाटचाल करत आहे. गुरुवारी पुण्यातील रुग्णालयात याच्या चाचण्या देखील सुरू झाल्या आहेत.