Covishield लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा निर्णय योग्य - डॉ.अँथनी फाउची

Covishield लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा निर्णय योग्य - डॉ.अँथनी फाउची

दिल्ली | Delhi

भारतात गेल्या काही दिवसांपासून करोनाने कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवल्याचं चित्र आहे. करोनाला रोखण्यासाठी सध्या लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरण मोहिमेवर भर दिला.

दरम्यान, कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटानं यासंदर्भात सल्ला दिला होता. त्यानुसार आता केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयाला व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि साथीच्या रोगांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी देखील पाठिंबा दिला आहे.

'करोनाला समूळ नष्ट करण्यासाठी भारताने लसीकरण मोहिमेला गती द्यायला हवी. पण कोविशील्ड लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय भारताने घेतला, हा एक चांगला निर्णय आहे,' असे म्हणत डॉ. फाउची यांनी भारताच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

तसेच, 'जेव्हा तुम्ही खूप संकटांचा सामना करत असता, अडचणीच्या काळात असता, आणि तुम्हाला जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करावयाचे असते, अशा वेळी भारताने घेतलेला निर्णय हा योग्य आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.

सध्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवडे इतकं होतं. आता ते अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थात, कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस थेट १२ ते १६ आठवड्यांनंतर म्हणजेच ३ ते ४ महिन्यांनंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान डॉ. अँथनी फाउची यांनी काही दिवसांपूर्वी भारतातील वाढत्या करोना रूग्णसंख्येवरून चिंता व्यक्त केली होती. त्यांनी भारताला सध्याच्या परिस्थितीमधून मार्ग काढताना काही तात्काळ आणि काही दुरगामी प्रभावी ठरणारे निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हटलं होतं. त्यांनी लॉकडाऊन, लसीकरणाचा वेग वाढवण्याचा तसेच फिल्ड हॉस्पिटलची गरज बोलून दाखवली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com