Covid19 : पंतप्रधान आज घेणार "या" सात राज्याचा आढावा

सर्वाधिक रुग्ण असलेल्या सात राज्यातील मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांसमवेत उच्चस्तरीय आभासी बैठक
Covid19 : पंतप्रधान आज घेणार "या" सात राज्याचा आढावा

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली आज सर्वाधिक करोना रुग्ण असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांसमवेत उच्चस्तरीय आभासी बैठक होणार आहे.

या राज्यांसोबत होणार बैठक

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि पंजाब. या राज्यांचा यात समावेश आहे.

देशातील 63% पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण या राज्यांमध्ये असून एकूण रुग्णांपैकी 65.5% आणि एकूण मृत्यूंपैकी 77% रुग्ण देखील या राज्यांमध्ये आहेत. इतर पाच राज्यांबरोबरच पंजाब आणि दिल्लीमध्ये अलिकडेच रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीमध्ये 2.0% पेक्षा जास्त मृत्यु दर (सीएफआर) आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेश व्यतिरिक्त त्यांचे बाधित रुग्णाचे प्रमाण 8.52% राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

हे असतील बैठकीतले विषय..

केंद्र सरकार, राज्य सरकारांबरोबर प्रभावी सहकार्य आणि जवळून समन्वय साधून देशातील कोविड विरूद्धचा लढा लढत आहे. केंद्र सरकार त्यांना आरोग्य आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी मदत करत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एम्स, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने राबवलेल्या ई-आयसीयू दूरध्वनी-सल्लामसलतद्वारे आयसीयू सांभाळणाऱ्या डॉक्टरांच्या क्लिनिकल व्यवस्थापन क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली गेली आहे. या उच्चस्तरीय आढाव्यामुळे रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची पर्याप्त उपलब्धता आणि कोविड आरोग्य सेवा सुविधा सुनिश्चित केल्या आहेत. केंद्र सरकार नियमितपणे राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये बहु-शाखीय पथक पाठवते जेणेकरून बाधित रुग्णांच्या नियंत्रण, देखरेख, चाचणी आणि कार्यक्षम वैद्यकीय व्यवस्थापनासाठी त्यांना मदत आणि मार्गदर्शन मिळेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com