दिल्ली । Delhi

देशात गेल्या २४ तासात १९ हजारांहून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मात्र अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनासाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

देशात मागील २४ तासांत देशभरात १९ हजार ७८ नवे करोनाबाधित आढळले, तर २२ हजार ९२६ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, करोनामुळे २२४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. याचबरोबर देशभरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ३ लाख ५ हजार ७८८ वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस देशात २ लाख ५० हजार १८३ अॅक्टिव्ह केसेस असून, ९९ लाख ६ हजार ३८७ जण आतापर्यंत करोनातून बरे झालेले आहेत. याशिवाय, करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १ लाख ४९ हजार २१८ वर पोहचली आहे.

देशभरात आजपासून लसीची ड्राय रन

आजपासून (शनिवार, २ जानेवारी) सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात लसीच्या (Covid-19 Vaccine) ड्राय रन (Dry Run) ला सुरुवात होणार आहे. या ड्राय रन्स ११६ जिल्ह्यातील २५९ केंद्रांवर होणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी काल देशभरातील लसीकरण मोहीमेच्या सर्व ठिकाणांवर सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, राज्यात पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार येथे लसीची ड्राय रन होणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ३ लसीकरण केंद्र उभारण्यात आली असून त्या प्रत्येक केंद्रात लसीकरणासाठी २५ लोक असणार आहेत.

राज्यातील पुण्यात जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय केंद्र असणार आहे. तर नागपूर मध्ये डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ट्राय रन होणार आहे. तसंच जालना येथील जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीची ड्राय रन होणार आहे.